
चित्रपटातील कलाकारांभोवती प्रसिद्धीचे वलय असते. त्यामुळे प्रत्येकाला त्यांच्यासारखे जीवन जगण्याची इच्छा असते. मात्र, ग्लॅमर आणि प्रसिद्धीच्या झोतातल्या या कलाकारांनीही आयुष्यात अनेक खस्ता खालेल्या असतात. तसेच त्यांना कठीण प्रसंगानांही सामोरे जावे लागले असते. या गोष्टी अनेकदा उजेडात येत नाहीत. काही कलाकार प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचल्यावर आपल्यासोबत झालेल्या घटनेबाबत वाच्यता करतात. तेव्हा प्रसिद्धीच्या झोतातील खडतरतेचा प्रत्यय येतो. प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिच्यासोबतही कास्टिंग काउचचा प्रयत्न झाला होता,अशी माहिती तिने एका मुलाखतीदरम्यान दिली आहे.
विद्या बालनने चित्रपट क्षेत्रात नाव मिळवल्यावर तिचे एकाचवेळी 12 प्रोजेक्ट सुरू होते. अभिनेत्री बनण्यासाठी आपल्याला खूप संघर्ष करावा लागल्याचे विद्याने यावेळी सांगितले. त्यामुळे स्वतःसाठी वेळ मिळाला नाही, असे ती म्हणाली. आपल्याला अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागल्याचेही तिने सांगितले. चेन्नईला कामासंदर्भात एका दिग्दर्शकाला भेटण्यासाठी गेल्यावर त्याने आपला गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचे विद्या म्हणाली. दिग्दर्शकाला भेटल्यावर तो म्हणाला, तुमच्यासोबत कामासंदर्भात बोलायचे आहे, कॉफी शॉपमध्ये जाऊन आपण बोलूया. आम्ही कॉफी शॉपमध्ये गेल्यावर येथे खूप गोंधळ आहे. आपण एका खोलीत शांततेत बसून बोलू, असे तो म्हणाला. त्याला गोंधळाचा त्रास होत असेल असे समजून मी त्याच्यासोबत खोलीत जाण्यास तयार झाले. खोलीत गेल्यावर सुरक्षेसाठी मी दरवाजा उघडाच ठेवला. त्यामुळे तो दिग्दर्शक काहीही न बोलता पाच मिनिटातच निघून गेला असे विद्याने सांगितले. एका प्रसंगावधानाने आपण बिकट प्रसंगातून बचावल्याचे ती म्हणाली.
आता विद्या बालन प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. मात्र, या ठिकाणी पोहचण्यासाठी कराव्या लागलेल्या संघर्षाचीही तिने माहिती दिली. दर्जेदार अभिनयाने तिने रसिकांची मनं जिकंली आहेत. ती महिला सक्षमीकरणासाठीही कार्य करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘मिशन मंगल’ चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.


























































