
>> संजय कुळकर्णी
वाहिनीवर सादर होणाऱ्या मालिका आता फारच विषयांतर करू लागल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. पटकथाकार वाहिनीने सांगितलेल्या कथेचा त्यांच्यापरीनं कल्पनाविलास बहुदा करीत असावेत. एकतर सादर होणाऱ्या या मालिका हिंदीत आणि बंगाली वाहिनीवर सुपरडुपर हिट झालेल्या असतात. वाहिनीवाल्यांचा त्याच मालिका मराठीतून सादर करण्याचा अट्टहास असतो. आपली मराठी संस्कृती त्या कथानकात फिट्ट करताना त्यांना तडजोड करावी लागत असेलही. समजा केलीच तरी एवढी? सध्याच्या लोकप्रिय ठरलेल्या मालिका पाहताना पटकथाकारांची कीव प्रेक्षकांना आली आहे. ‘आई कुठं काय करते?’ मालिकेची कथा आता एक वेगळय़ाच वळणावर आली आहे. वळण घेतलंय पटकथाकाराने. देवमाणूस, भाग्य दिले तू मला, रंग माझा वेगळा आणि नवा गडी नवं राज्य इत्यादी मालिकांबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकून तरी वाहिनीवाले त्यावर प्रकाशझोत टाकणार आहेत का?
मीलन पोळ आणि रजनी विचारे या गृहिणी सर्वच मालिका आवर्जून पाहतात. सध्या मात्र दोघी मालिकांवर प्रचंड वैतागलेल्या दिसतात. मीलन पोळ म्हणाल्या, सुरुवातीला मालिकांचे प्रोमो छान दाखवतात. नंतर मात्र त्या कंटाळवाण्या होत जातात. ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत आपल्या मुलाचं काहीच म्हणणं आईला पटत नाही. रजनी विचारे म्हणतात, मराठी प्रेक्षकांच्या भावनांशी खेळून त्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नये. त्यामुळे त्या मालिका पाहण्यापेक्षा टीव्हीच बंद केलेला बरा. नाशिकच्या डॉ. अनघा कुळकर्णी म्हणतात, काही मालिका या अत्यंत सुमार दर्जाच्या असतात. असंस्कृत, अभिरुचीहीन हिंस्र कृत्य दाखविणाऱ्या असतात. ज्या हिरोहिरोईनचे लग्न होते, त्यांचे पूर्वीचे प्रियकर येतात, मध्येच प्रेम, मध्येच द्वेष पराकोटीचा असतो. फारच कमकुवत हिरोच्या व्यक्तिरेखा दाखवतात. हे ‘लग्नाची बेडी’ या मालिकेत दृष्टीस पडलं. ‘ठिपक्यांची रांगोळी’त सर्वजण एका रेषेत उभं राहून संवाद बोलतात. नुसत्या माना डोलावतात. ओढून ताणून काहीतरी प्रसंग आणतात. अप्पू सहन न करण्याएवढी बालिश व्यक्तिरेखा आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत सामाजिक समस्या छान दाखवली. ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत कीर्तीची भूमिका छान आहे.
‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेबद्दल राधा मराठे म्हणाल्या, या मालिकेतील बिनडोक रत्नमाला मुलगा घर सोडून गेला तरी चालतं, नाती जपत बसली आहे. फ्रॉड करणारी माणसं चालतात. मालिका बंद करा. लेखकाला मालिका लिहिता येत नसतील दुसरा लेखक घ्या, पण आपली मराठी संस्कृती जपा.
‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेबद्दल रजनी विचारे म्हणाल्या, ती रमा भूत दरवाजाच्या आरपार जाऊ शकते, कशालाही हात लावू शकत नाही आणि राघवने घेतलेला स्वतःचा ड्रेस हातात घेऊन बसते, हे काय लॉजिक?
एकंदरीत महिला प्रेक्षकवर्ग या मालिका पाहण्यास वैतागलेला आहे त्या केवळ सादर होणाऱ्या कथानकांमुळेच. मालिका अशा पाहिजेत, ज्यात संस्कारक्षम, चांगलं शिकायला मिळालं पाहिजे. मालिका सुरू झाली की, शेवटपर्यंत चांगलं शिकता आलं पाहिजे. मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांना असं वाटलं पाहिजे की, ही मालिका संपूच नये. वाहिनीवाल्यांनो, हे मनावर घ्या की राव.




























































