IPL 2025 – लय गवसलेल्या MI ला मोठा धक्का; पदार्पणाचा सामना गाजवणारा खेळाडू स्पर्धेतून बाहेर

पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचा संघ चांगलाच लयीत आला आहे. पहिल्या काही लढतीत नेहमीप्रमाणे मार खाल्ल्यानंतर मुंबईने लागोपाठ पाच विजय मिळवला आणि प्ले ऑफच्या रेसमध्ये एन्ट्री केली. लय गवसलेल्या मुंबईचा सामना आज पहिल्या हंगामातील विजेत्या राजस्थान रॉयल्स संघाशी होणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानावर सायंकाळी साडे सात वाजता हा सामना रंगेल. मात्र तत्पूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला असून 24 वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूर हा दुखापतीमुळे उर्वरित हंगामातून बाहेर गेला आहे. त्याच्या जागी 32 वर्षीय रघू शर्मा याला मुंबईच्या संघात स्थान मिळाले आहे.

विघ्नेश पुथूर याने यंदा आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणाच्या लढतीतच विघ्नेशने छाप उमटवली होती. तसेच यंदाच्या हंगामात त्याने 5 लढतीत 18.17 च्या सरसरीने 6 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र दुखापतीमुळे तो उर्वरित हंगामाला मुकणार आहे. त्याच्या जागी मुंबईने फिरकीपटू रघू शर्मा याची संघात निवड केली आहे.

रघू शर्मा हा पंजाब आणि पुद्दचेरीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे. त्याने प्रथम श्रेणीच्या 11 लढतीत 57 विकेट्स घेतलेल्या आहेत. 56 धावांमध्ये 7 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. रघूने लिस्ट-एच्या 9 लढतीत 14 विकेट्स घेतल्या आहेत, तर त्याने आतापर्यंत 3 टी-20 सामने खेळले असून यात 3 विकेट्स घेतल्या आहेत. 30 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर मुंबईने त्याला संघात घेतले आहे.

पदार्पणाचा सामना गाजवलेला

दरम्यान, विघ्नेश पुथूर याने आयपीएलच्या पदार्पणाचा सामना गाजवला होता. 24 वर्षीय पुथूर याने पहिल्या लढतीत ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि दीपक हूडा या तिघांची विकेट घेतली होती. भलेही तो सामना चेन्नई जिंकली असली तरी सामना संपल्यानंतर धोनीनेही पुथूरची भेट घेत त्याच्याशी संवाद साधला होता.

IPL 2025 – चेपॉकवर पंजाबच ‘किंग’, थाटात सामना जिंकला; पण BCCI नं चूक पकडली अन् श्रेयस अय्यरला भूर्दंड बसला