पाऊस पावला, विहार तुडुंब! तीन दिवसांत 26 दिवसांचा जलसाठा

201

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्य़ा तलाव क्षेत्रात होणारा जोरदार पाऊस चांगलाच पावला असून केवळ तीन दिवसांत 26 दिवसांचा जलसाठा जमा झाला आहे. 3 ते 5 जुलै या कालावधीत जलसाठ्यात 97916 दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. हे पाणी 26 दिवसांना पुरणारे आहे. तलावांतील एकूण जलसाठा आता 600158 दशलक्ष लिटर म्हणजेच 42 टक्के झाला असून हे पाणी पुढील 158 दिवसांना पुरणारे आहे. जोरदार पावसामुळे विहार तलावही ओसंडून वाहू लागला आहे.

मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांना वर्षभर पुरेसे पाणी मिळण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी सातही धरणांत मिळून 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते. यावेळी उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाते. मात्र यावर्षी जून-जुलैमध्ये तलाव क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने खबरदारी म्हणून नियोजन करण्यासाठी मुंबईत 5 ऑगस्टपासून 20 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्य़ा तलावक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे तलाव वेगाने भरू लागले आहेत. त्यामुळे लवकरच वर्षभराचा जलसाठा जमा होऊन पाणीकपात रद्द होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

‘विहार’मधून दररोज 90 दशलक्ष लिटर पाणी

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्य़ा तलावांपैकी एक असलेला विहार तलाव गुरुवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास ओसंडून वाहू लागला. 27,698 दशलक्ष लीटर उपयुक्त जलधारण क्षमता असणारा हा तलाव गतवर्षी दिनांक 31 जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर 2018 मध्ये दिनांक 16 जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता. या  तलावातून 90 दशलक्ष लीटर (9 कोटी लीटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. विहार तलाव पालिका मुख्यालयापासून साधारणपणे 28.96 किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. या तलावाचे बांधकाम सन 1859 मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे 65.5 लाख रुपये एकढा खर्च तेव्हा आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 18.96 किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 7.26 चौरस किलोमीटर एवढे असते.

6 ऑगस्ट रोजीचा पाणीसाठा

(दशलक्ष लिटरमध्ये)

तलाव    पाणीसाठा       टक्केवारी     

अप्पर वैतरणा        50158          22.11

मोडक सागर 59648 46.27

तानसा     51186   35.38

मध्य वैतरणा 80753 41.73

भातसा   322628 44.99

विहार      27698    100

तुळशी      8046     100

एकूण     600158 41.47

अशी झाली पाणीसाठ्यात वाढ

सातही तलावांत मिळून 3 ऑगस्ट रोजी 502242 दशलक्ष लिटर पाणी होते. हे पाणी 132 दिवसांना पुरणारे होते. तर 6 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता 600158 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. म्हणजेच तीन दिवसांत जलसाठ्यात 97916 दशलक्ष लिटर पाण्याची वाढ झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या