
सामना प्रतिनिधी, मुंबई
हवामान खात्याचे अंदाज खरे ठरवत शहर आणि उपनगरात सोमवारीही पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. समुद्राला सोमवारी मोठी भरती असल्याने समुद्रात ४.८९ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला असून मोडकसारपाठोपाठ पवईजवळचा विहार तलावही ओसंडून वाहू लागला.
काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर वीकेंडला पुन्हा एकदा पावसाने मुंबईला झोडपून काढले. आज सोमवारी नोकरदारांची कार्यालये गाठण्याची घाई असताना आजही पावसाने आपली हजेरी लावली. काळेकुट्ट ढग, मिट्ट अंधार आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे वातावरण चांगलेच आल्हाददायक झाले होते. सोमवारी दिवसभरात आठ ठिकाणी घरे व भिंतीचा भाग कोसळला. १० ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या तर ४६ ठिकाणी झाडे तसेच झाडाच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या.
- गेल्या २४ तासांत कुलाबा येथे ११.६ मि. मी.
- सांताक्रुझ येथे ९४.८ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली
- शहर ५७ ०९ मि.मी.
- पूर्व उपनगरे ७६.४० मि.मी.
- पश्चिम उपनगरात ५६.८३ मि. मी.पावसाची नोंद झाली.
- समुद्राला भरती आणि कचऱ्याच्या लाटा, २०० मेट्रिक टन कचरा उचलला
सोमवारीसुद्धा समुद्राला मोठी भरती होती. भरतीचे पाणी आणि लाटांच्या तडाख्याबरोबर सोमवारीही मुंबईतील समुद्रकिनारी तब्बल २०० मेट्रिक टनांपेक्षाही जास्त कचरा जमा झाला. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित साफसफाई हाती घेऊन हे किनारे स्वच्छ केले.
मरीन ड्राइव्ह येथून ११ मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला. ५५ कामगारांनी मिळून काही तासांतच हा किनारा स्वच्छ केला.गिरगाव चौपाटीवर ४ मेट्रिक टन , दादर-माहीम चौपाटीवर ६५ मेट्रिक टन, जुहू चौपाटीवरून ९० मेट्रिक टन, वर्सोवा येथून २५ मेट्रिक टन तर गोराई बीचवरून १५ मेट्रिक टन कचरा उचलला असून दिवसभर कचरा उचलण्याचे काम सुरू होते.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात पावसाने चांगलाच जोर धरला असून पाणीसाठय़ात चांगलीच वाढ झाली आहे. रविवारी मोडकसागर तलाव ओसंडून वाहू लागला. त्यापाठोपाठ आज सकाळी १०.३० वाजल्यापासून विहार तलावही तुडुंब भरून वाहू लागला. गतवर्षी हा तलाव १५ जुलैला भरला होता. या सातही तलावांमध्ये सध्या ९,३४,२११ द.ल.लिटर इतका पाणीसाठा जमा आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे या सर्व तलावांमध्ये ३१ दिवसांचा पाणीसाठा जमा झाला आहे.
गेल्या २४ तासांत
- अप्पर वैतरणा तलावात १४०.०० मि.मी.
- मोडकसार १६८ .०० मि. मी.
- तानसा ९९.०० मि. मी.
- मध्य वैतरणा १७१.०० मि. मी.
- भातसा १०४.०० मि. मी.
- विहार ८४.०० मि. मी.
- तुळशी १०१.००मि .मी.इतक्या पावसाची नोंद झाली.
रविवारी आलेल्या सर्वात मोठ्या भरतीच्या लाटांनी वरळी सी फेसची अशी अवस्था केली. संरक्षक कठड्यावरील लाद्याच या भरतीच्या लाटांनी उचलून रस्त्यावर फेकून दिल्या होत्या. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. शनिवारपासून समुद्रात पाच मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत. या लाटांमधली ताकदच या दृश्यातून दिसते.




























































