
सामना ऑनलाईन । बंगळुरू
अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत विदर्भाने विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत सुस्साट सुटलेला महाराष्ट्राचा विजयरथ रोखला. ‘अ’ गटात आतापर्यंत झालेल्या सहा लढतींत महाराष्ट्राचा हा पहिला पराभव, तर विदर्भाचा पहिला विजय ठरला. दर्शन नळकांडेची अष्टपैलू कामगिरी या लढतीचा टर्निंग पॉइंट ठरली.
महाराष्ट्राकडून मिळालेले 206 धावांचे लक्ष्य विदर्भाने 49.2 षटकांत 7 फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केले. महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी विदर्भाची एक वेळ 5 बाद 48 अशी दुर्दशा केली होती. मात्र त्यानंतर मधल्या फळीतील अक्षय वाडकर (नाबाद 82) व दर्शन नळकांडे (नाबाद 53) यांनी नाबाद 83 धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. दर्शनने 30 चेंडूंत 5 षटकार व एका चौकारासह आक्रमक अर्धशतक झळकावून मॅचविनिंग खेळी केली. महाराष्ट्राकडून समद फल्लाने 2 बळी टिपले, तर अनुपम संकलेचा, अशाय पालकर, सत्यजित बच्छाव व श्यामसुझम काझी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राला 8 बाद 205 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. ऋतुराज गायकवाड (32) व जय पांडे (28) यांनी अर्धशतकी सलामी दिल्यानंतर अंकित बावणेने सर्वाधिक 62 धावांची खेळी केली. मग नौशाद शेख (19), रोहित मोटवाणी (28) व श्यामसुझम काझी (17) यांनी महाराष्ट्राला दोनशेचा टप्पा ओलांडून दिला. विदर्भाकडून दर्शन नळकांडे, आदित्य सरवते व संजय रामास्वामी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.



























































