
सामना ऑनलाईन, लंडन
बँकांना हजारो कोटी रुपयांना चुना लावून परदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याला लंडनच्या न्यायालयाने जबरदस्त दणका दिला. लंडनच्या न्यायालयाने मल्ल्याची प्रत्यार्पणाच्या विरोधात दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. त्यामुळे मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. हिंदुस्थानातील विविध बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून मद्यसम्राट विजय मल्ल्याने ब्रिटनमध्ये आसरा घेतला आहे. हिंदुस्थान व ब्रिटनमध्ये झालेल्या करारानुसार विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणास ब्रिटिश गृहमंत्री साजिद नाविद यांनी मंजुरी दिली. या मंजुरीच्या विरोधात विजय मल्ल्याने लंडनच्या न्यायालयात धाव घेतली आहे. मुख्य न्या. ऍमा अर्बुथनॉट यांनी मल्ल्याचा अर्ज फेटाळून लावत प्रत्यार्पणाला मंजुरी दिली. यापूर्वीच्या सुनावणीत न्या. ऍमा यांनी विजय मल्ल्याच्या विरोधात कर्ज बुडवेगिरीचे भक्कम पुरावे असल्याचे स्पष्ट करून मल्ल्याने बँकांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवला होता.


























































