महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा हजेरीचा प्रश्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

>> विजय पांढरीपांडे

इकडे आपण नवे शैक्षणिक धोरण आणतो. नवे अभ्यासक्रम लावतो. कॉलेज, विद्यापीठाच्या दर्जाच्या, मानांकनाची चिंता करतो, जागतिक स्पर्धेची बात करतो, अन् तिकडे या सर्वाचा जो केंद्रबिंदू विद्यार्थी तो वर्गातील हजेरीबाबत बेजबाबदार वागतो, एरवी स्वातंत्र्य, स्वायतत्ता यांच्या गप्पा मारायच्या, पण मुलांना आवडते ते हवे तसे हव्या त्या वेळी शिकण्याचे स्वातंत्र्य आपण देतो का? शिवाय हीच मुले मॉलमध्ये तासन् तास फिरतात, पण वर्गातच का येत नाहीत, तेही नव्याने शोधायला हवे.

आजकालच्या कॉलेजला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची नावे कोर्टातल्यासारखा पुकारा करण्याची गरज निर्माण झाली आहे. अगदी ज्युनियर कॉलेजपासून तर पदवी, पदव्युत्तर कॉलेजपर्यंत विद्यार्थ्यांची गैरहजेरी हा चिंतेचा विषय झाला आहे. याला कोणतेही कॉलेज, कोणताही कोर्स अपवाद नाही. अगदी इंजिनीअरिंग, मेडिकल, सायन्स सगळीकडे अटेंडन्सची समस्या आहे. जिथे प्रॅक्टिकल असते, तिथे गरज म्हणून उपकार केल्यासारखे कसेतरी प्रयोग केले जातात. बाकी जर्नल लिहिणे म्हणजे कॉपी ही पूर्वापार परंपरा आहे. 75 टक्के हजेरी हवीच हा नियम फक्त कागदावर. अनेक प्राध्यापकांनी हजेरी घेणे सोडून दिले आहे. प्राचार्यांना पाठवायची हजेरी ही सत्र संपले की उपचार म्हणून पाठवलेला, मॅनेज केलेला डेटा. सरकारी, खासगी सर्वच संस्थांमध्ये सारखीच परिस्थिती.

जी मुले 10 वी पर्यंत नियमित शाळेत जातात, त्यांना कॉलेज हे बिरूद लागले की, अचानक पंख फुटतात. कॉलेजमध्ये गेले काय, न गेले काय, काही फरक पडत नाही, हे त्यांना सीनियरकडून कळते. शिवाय लेक्चर, नोट्स, गाईड्स हे शिक्षकांपेक्षा जास्त जवळचे, उपयोगी हा सल्लादेखील फुकटात मिळालेला. परीक्षेत नेमके काय विचारतात, त्याचे कसे कितपत उत्तर द्यायचे, आडाखे, ठोकताळे ठरलेले. ते आपल्या परंपरांगत परीक्षा पद्धतीमुळे चुकत नाहीत. परीक्षा म्हणजे कसलेही आव्हान नसते आजकाल. थोडाही पेपर कठीण आला की, बोंबाबोंब करायला संघटना, स्वयंसिद्ध पुढारी आहेतच मोर्चा न्यायला. निकालदेखील कडक लागण्याची, लावण्याची सोय राहिली नाही. तिथेही मॉडरेशन नावाची काठी आहेच तारून न्यायला. त्यामुळेच विद्यार्थी बिनधास्त झाले आहेत. केव्हा काय करायचे, कसे तरून जायचे, हे त्यांना पक्के ठाऊक झाले आहे. खरे तर अनेक अभ्यासक्रमांची फी हजारो, लाखो रुपये असते वर्षाला. खासगी कॉलेजेसबद्दल तर विचारायलाच नको. पदराला खार लावून, स्वतः अडचणी सहन करून ही भरमसाट फी भरणारे पालकदेखील विद्यार्थ्यांच्या कॉलेज हजेरीबद्दल जागरूक नसतात, हे आश्चर्यच! मुले दिवसभर काय करतात, कुठे जातात याची साधी विचारणादेखील होत नाही. क्वचित विचारले तर तुम्हाला काय कळते, अशी उलट उत्तरे मिळतात. काही अपवाद असतीलही या विधानांना, पण बहुतांश परिस्थितीही चिंताजनकच.

हे असे आधीही होते का, तर नाही. मी शिक्षण क्षेत्रात गेली चार दशके कार्यरत आहे. 19 70/ 80/90 च्या दशकांत 90 टक्के हजेरी असे. अगदी सुट्टीच्या दिवशी गरज पडल्यास बोलावले, तर विद्यार्थी येत, तेही 90 टक्के. एवढेच कशाला, बंदसाठी मोर्चा आला की तेवढय़ापूरते बाहेर जाणार, पण मोर्चा दूर गेला की, स्वतःहून क्लास घ्या म्हणून प्राध्यापकाला बोलवायला येणार. हे मी अनुभवले आहे. एकदा तर एक महत्त्वाचे लेक्चर बंद असताना डिपार्टमेंटला बाहेरून कुलूप लावून आत मुलांनी अटेंड केले. आयआयटीसारख्या संस्था रेसिडेन्सीअल असल्याने मुले 100 टक्के हजर असत, पण हळूहळू कसे काय कुणास ठाऊक, सारेच बदलत गेले. शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी तर जॉब हाती असल्याने हजरच नसतात. वर्गात हजर न राहतादेखील प्रथम श्रेणीत, प्रावीण्यासह उत्तीर्ण होतात. कारण परीक्षेत तेच ते प्रश्न शब्द फेरफार करून विचारले जातात. त्यांची ठरावीक तीच ती उत्तरे ठरावीक वेळात दिली की, गंगेत घोडे न्हाले.

एकतर कॉलेजचे म्हणजे वर्गातले वातावरण आता पूर्वीसारखे राहिले नाही. वाचनालयात जायची गरज राहिली नाही. हवी ती इन्फॉर्मेशन (ज्ञान नव्हे!) हातातल्या मोबाईलमध्ये मिळते. शिवाय आजकाल तुम्हाला नोकरी देणाऱयाला तुमची पदवी, तुमचे मार्क्स, तुमचे विद्यापीठ यात काही रस नसतो. तुम्ही त्याच्या कामासाठी लायक आहे की नाही, त्याला हवे ते डिलिव्हर करू शकणार की नाही, त्याचा धंदा वाढवायला तुमचा उपयोग आहे की नाही, तुम्ही टीममध्ये संवाद साधून एकत्र काम करण्यास योग्य आहात की नाही, हेच पाहिले जाते. यासाठी वर्गातली हजेरी गरजेची नाही हे मुलांना माहिती झाले आहे.

शिवाय अवतीभवती दिसणारी उदाहरणेदेखील प्रेरक, नीती न्याय सांभाळणारी, सत्याची कास धरणारी अशी राहिली नाहीत. ज्यांच्याकडून काही घ्यावे, शिकावे असे किती जण सापडतील, देवच जाणे! मुख्य म्हणजे शिक्षण पद्धतीत शिकण्यावर भर नाही. मार्क महत्त्वाचे अन् ते कसे मिळवायचे याचे गणित नव्या पिढीला समजून चुकले आहे. हे मार्कांचे मॅन्युप्युलेशन घरी बसल्या करता येते. मग वर्गात जायचे कशाला, वेळ वाया घालवायचा कशाला, ही मनोवृत्ती झालीय. त्यात दोष कुणाला द्यायचा, जबाबदार कुणाला धरायचे हा वादाचा विषय, संशोधनाचा विषय म्हणा हवे तर!

आपण नवे शैक्षणिक धोरण, नॅक, स्किल बेस्ड एज्युकेशन, आऊटपुट बेस्ड पद्धती, ग्लोबल स्पर्धा, वगैरेच्या फक्त गप्पा मारायच्या. वर्कशॉप घ्यायचे, अहवाल तयार करायचे अन् आकडे दाखवून कुठे किती प्रगती झाली, याचे ढोल पिटत बसायचे. विद्यार्थ्यांना नेमके काय हवे, त्यांची मानसिकता कशी आहे, त्यांची आवडनिवड कशात आहे, याचा विचार नाही. आम्ही सांगतो ते करा, आम्ही म्हणतो ते तसेच शिका, परीक्षेत आम्हाला अपेक्षित तेवढे तसेच लिहा. हा आमचा आग्रह. एरवी स्वातंत्र्य, स्वायतत्ता यांच्या गप्पा मारायच्या, पण मुलांना आवडते ते हवे तसे हव्या त्या वेळी शिकण्याचे स्वातंत्र्य आपण देतो का? हा खरा प्रश्न आहे. शिवाय हीच मुले मॉलमध्ये तासन् तास फिरतात, गप्पा मारतात, पण वर्गातच येत नाहीत, ते का हेही नव्याने शोधायला हवे. शिस्तीच्या बाबतीत तडजोड नको, दबावाला बळी पडणे नको. कारण तुमच्या दुबळेपणाचादेखील ही मुले फायदा घेतात. मांजराच्या गळय़ात घंटा कुणी बांधायची हा प्रश्न असतो, बाकी सारे शक्य असते. आजही चांगले शिस्तीचे प्राध्यापक आहेत. शिस्त पाळणाऱया निवडक संस्था आहेत. त्यांचे कार्य अधोरेखित करायलाच हवे, पण हे प्रमाण फार कमी. मागे कॉपी मुक्तीसाठी आंदोलन झाले, तसे काहीसे वर्गातल्या हजेरीसाठीही झाले पाहिजे. त्यात विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, संस्था सर्वांचा सक्रिय सहभाग असला पाहिजे. मग विद्यार्थ्यांना ‘हाजिर हो’ असे म्हणण्याची वेळ येणार नाही.

(लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत)