
कोणत्या समाजाला आरक्षण मिळावे याबद्दल ओबीसी समाजाचा मुळीच आक्षेप नाही. ओबीसी समाज कोणत्याही जात, धर्म, पंथांविरुद्ध नसून आम्हाला केवळ आमचे आरक्षण अबाधित ठेवायचे आहे. यासाठीच ओबीसी समाज लढा देत आहे. मात्र कोणी आमच्या आरक्षणाच्या वाटय़ातून वाटा मागणार असेल तर मात्र आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसीच्या मोर्चादरम्यान दिला.
वडेट्टीवार म्हणाले की, आजचा ओबीसी समाजाचा मोर्चा हा कोणत्याही जाती, धर्म, पंथ किंवा पक्षाविरुद्ध नसून ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आहे. राज्यातील अनेक जिल्हय़ातील अठरा पगड जाती आणि ओबीसी समाजातील बहुतांशी कुटुंब आजही अर्धपोटी राहून जीवन जगत आहे.
ओबीसी आरक्षणाचा कोणाताही लाभ या समाजापर्यंत पोहचत नसल्यामुळे विकासापासून वंचित आहे. आपल्या मागण्या घेऊन हा आपला आवाज सरकारपर्यंत पोहचविण्याचे काम आपण करणार आहोत. ज्या समाजात आपण जन्म घेतला त्या समाजाच्या हक्कासाठी लढले पाहिजे.
ओबीसी समाजाच्या हक्काच्या लढाईसाठी आपण कशाचीही पर्वा करणार नाही, असे स्पष्ट करून ओबीसी समाजाची जातनिहाय स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे एवढीच रास्त मागणी आमची आहे. पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे आपण ही मागणी केली असून, गरज पडली तर ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेचा प्रस्ताव आपण स्वतः निधी मंडळात मांडणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित राहावे यासाठी सुरू करण्यात आलेली लढाई जोपर्यंत आपण जिंकत नाही, तोपर्यंत शांत बसायच नाही. जालन्यात ओबीसी मोर्चा काढून येथील ओबीसी बांधवांनी जाळ पसरवल असून, त्यात कोण फसेल हे सांगता येत नाही, अशी मार्मिक टिप्पणीही वडेट्टीवार यांनी यावेळी केली.
आमच्या मुळावर आलात तर…
ओबीसी समाजामध्ये सतत भांडण लावण्याचे काम करून काही मंडळींनी सत्ता मिळविण्याचे प्रयत्न केले आहेत. कोणत्याही समाजाला आरक्षण मिळू नये, असा ओबीसी समाजाचा हेतू मुळीच नाही. परंतु आमच्या मुळावर येईल त्यांची जिरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणातून दिला. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी ओबीसी मोर्चाच्या निमित्ताने एकत्र आल्याबद्दल सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.































































