विक्रोळीतील रखडलेले प्रश्न लवकरच मार्गी लागणार, शिवसेनेला पालिकेचा सकारात्मक प्रतिसाद 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विक्रोळी विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांच्या कामातील दिरंगाई, रखडलेल्या दुरुस्तीमुळे होणारे अपघात, मलनिःसारण वाहिन्या आणि जलवाहिन्या अशा प्रश्नांसंदर्भात शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिका अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज झाली. यावेळी कामांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर रखडलेली कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शिवसेनेला दिले.

या बैठकीत कन्नमवार नगर येथील लेफ्टनंट आत्माराम सुर्वे मार्ग व स्वयंभू हनुमान रोड या दोन्ही रस्त्यांना 8 कोटी 83 लाखांचा निधी मंजूर असतानाही या रस्त्याची कामे सुरू करण्यामध्ये दिरंगाई होत असल्याने सुनील राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर उपायुक्त संतोषकुमार घोडे यांनी संबधित कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. कन्नमवार नगर आणि टागोर नगर येथील मलनिःसारण वाहिन्या आणि जलवाहिन्या याबाबत म्हाडा आणि पालिकेत समन्वयाचा अभाव असल्याने सुनील राऊत यांनी हा प्रश्न वारंवार अधिवेशनात उपस्थित केला होता तसेच पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याप्रमाणे म्हाडाने जलवाहिनी पालिकेकडे वर्ग केल्याचे आणि मलनिःसारण लाईन फेज-1 चे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती उपायुक्तांनी दिली. टागोर नगर स्मशानभूमी, कन्नमवार नगर येथील क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालय, टागोरनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांजूर महापालिका आरोग्य पेंद्र या सर्व ठिकाणी भेट देण्याबाबत तसेच विक्रोळी पूर्व येथे स्वच्छतागृहाच्या बांधकामाबाबतच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. बैठकीला शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

जेव्हीएलआर ते पवईतील रस्ते दुरुस्त होणार 

नामदेवराव पाटणे मार्ग व परेश पारकर मार्ग हे रस्ते आरएल होतील. भांडुप एम. डी. केणी रस्त्याचे काम हाती घेण्याबाबत तसेच टागोर नगर साईनगर येथील डीपी रोड ओपन करण्याबाबत संतोषकुमार घोडे यांनी आश्वासन दिले. तसेच जेव्हीएलआर ते पवई हा रस्ता नादुरुस्त रस्त्याबाबत एमएमआरडीएसोबत बैठक झाली असून सदर रस्ता दुरुस्तीबाबत लवकर निर्णय होईल, असे एस वॉर्डचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांनी सांगितले.