
नगर परिषदेच्या मागणीसाठी घुग्गुस गावानं एकी दाखवत ग्रामपंचायतीच्या संपूर्ण प्रक्रियेवरच बहिष्कार घातला. त्यामुळं प्रशासनही चक्रावून गेलं. विशेष म्हणजे साच्याच राजकीय पक्षांनी गावाशी निष्ठा राखत उमेदवारी दाखल केली नाही. एखाद्या निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेवरच गावानं बहिष्कार टाकण्याची जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस हे गाव सध्या चर्चेत आहे. एरव्ही सर्वोच्च प्रदूषणासाठी गाजणारं हे गाव आता एकीसाठी आदर्श ठरलं आहे. सीमेंट कारखाना, पोलाद उद्योग, कोळसा खाणी असलेलं हे औद्योगिक शहर आता नगरपालिका स्थापनेसाठी एकवटलं आहे. शहराची लोकसंख्या 32 हजारांवर गेली असल्यानं नगरपालिकेचे निकष हे शहर पूर्ण करते. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून इथं नगरपालिकेची मागणी होत आहे.
या मागणीच्या अनुषंगानं मागील ऑगस्ट महिन्यात प्राथमिक अधिसूचना निघाली. यामुळं नागरिकांत मोठा आनंद होता. पण आता ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर घुग्गुसचं नाव त्यात आलं आणि लोकांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळं गावकरी आणि राजकीय पक्षांनी एकत्र येत ग्रामपंचायत निवडणुकीत कुणीही भाग घ्यायचा नाही, असा निर्णय घेतला आणि त्यावर गाव आणि सारे राजकीय पक्ष कायम राहिले. काल 30 डिसेंबरला अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती; मात्र घुग्गुस ग्रामपंचायतसाठी एकही उमेदवारी अर्ज आलेला नाही. त्यामुळं प्रशासनाला आता प्रशासक बसवण्याशिवाय गत्यंतर उरलं नाही.
घुग्गुसवासी यावेळी आरपारची लढाई लढण्याच्या तयारीत आहेत. आता नाही तर केव्हाच नाही, अशी त्यांची मानसिकता झालेली आहे. आणि त्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक ही आयती संधी होती. त्याचा पुरेपूर लाभ उठवत शासनावर दबाव आणण्याचा वेगळा प्रयोग इथल्या लोकांनी यशस्वी करून दाखवला. नगरपालिका झाल्यास त्याचे अनेक फायदे गावाला मिळतील, अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे.
दरम्यान, घुग्गुसवासीयांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळं प्रशासन कामाला लागलं असून, आज तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेत प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याच्या हालचाली सुरू केल्यात. आता शासन यावर काय निर्णय घेतं, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


























































