
मंगळवारी देशभरात मोठ्या उत्साहात 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. देशाच्या विविध भागांमध्ये ध्वजाला सलामी देत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह खास होता. कारण इथे पहिल्यांदाच तिरंग्याला सलामी देत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
छत्तीसगडचे अनेक जिल्हे हे नक्सलग्रस्त आहेत. अशाच नक्षलग्रस्त भागात सुकमा जिल्ह्यातील मिनपामध्ये 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. हा दिवस सोनेरी अक्षरात लिहावा असाच आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इथे तिरंग्याला सलामी देण्यात आली आणि ‘भारत माता की जय’ घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला होता. आतापर्यंत या भागातील लोकांनी कधी तिरंगा झेंडा पाहिलाही नव्हता. पहिल्यांदाच हा सोहळा पार पडत असल्याने गावकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाल्याचे आजतकच्या वृत्तात म्हटले आहे.
इतक्या वर्षात इथे कुठलीही प्रशासकीय यंत्रणा कार्यरत नव्हती. सोयीसुविधांपासून हा प्रदेश बराच दूर आहे. नुकताच इथे पोलीस कॅम्प सुरू करण्यात आला आहे. ज्यामुळे गावकऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. प्रशासन यंत्रणा कार्यरत झाल्यानंतर समाधान व्यक्त केले जात आहे.
इथे सीआरपीएफ डीआयजी योज्ञान सिंह आणि एसपी कन्हैया लाल यांच्या नेतृत्वात नवा कॅम्प सुरू करण्यात आलेला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गावकऱ्यांसोबत सीआरपीएफची 150 वीं बटालियन, सेकेन्ड बटालियन, कोबरा 206 बटालियन, एसटीएफ आणि डीआरजी यांनी एकत्र येत हा राष्ट्रीयसण मोठ्या उत्साहात पार पाडला.




























































