‘हॅलो हॅलो’चा आरंभ!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनायक

पु. ल. देशपांडे यांची ‘वाऱयावरची वरात’ आता यूटय़ूबवरही उपलब्ध आहे. त्यातल्या ‘रविवारची सकाळ’ या भागात पु. ल. पेटी (संवादिनी) वाजवायला लागले की, नेमका फोन येतो. एक फोन त्यांच्या घरचा गडी घेतो आणि म्हणतो, ‘‘हालू’’… पुढे पलीकडच्या त्याच्याच मित्राला सांगतो, ‘‘अरे, तू हलू नाय, मी हलू… तू मोठय़ान्.’’ मधू कदम यांनी ती भूमिका अप्रतिम रंगवली आहे.

…तर फोन घेतला की, ‘हॅलो’ आणि बोलणं संपलं की, ‘ठेवतो’ हे शब्द प्रतिक्षिप्त क्रियेने यायला लागले. आता सेलफोनचा रिसिव्हर नसल्याने ‘ठेवावा’ लागत नाही, पण पूर्वीच्या लोकांची तशी सवय काही सुटत नाही. यंत्रयुग असे नवनवीन शब्द आपल्या जीवनात आणतं. विसावं शतक संपेपर्यंत ‘कम्पुटर’ आला होता. आपण त्याला ‘कॉम्प्युटर’ म्हणू लागलो ते कायमचं. त्यानंतर हळूहळू ‘इंटरनेट’, मोबाईल (काही काळ ‘पेजर’) तसंच ‘डेटा’, ‘सीडी’, ‘डीव्हीडी,’ पेन ड्राइव्ह’, ‘ई-मेल’, ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्राम,’ ‘व्हॉट्सऍप’ (त्याला बरेच ‘व्हॉट्सअप’ म्हणतात, पण ऍप म्हणजे ऑप्लिकेशन म्हणून उच्चार व्हॉट्सऍप असावा) असे अनेक शब्द संपर्क क्षेत्रात रुजले. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात आलेले बल्ब, रेडिओ, मोटर कार (मोटार), ट्रक, ट्रक्टर, ट्रेन, स्टेशन किंवा घराघरांत शिरलेले गॅस, फ्रीज, मिक्सर, फूड प्रोसेसर, वॉशिंग मशीन असे किती शब्द आपण पचवले याची गणती फार मोठी होईल.

आज थोडक्यात कथा टेलिफोनची. त्याचं रूपांतर लगेचच नुसत्या ‘फोन’मध्ये झालं. त्याला मराठीत ‘दूरध्वनी’ असा शब्द आला तसा ‘लिफ्ट’साठी ‘उद्वाहन’सुद्धा आहे, पण आताची पिढी तर ‘एलिव्हेटर’ म्हणते. हा काळाचा महिमा. काही शब्दांचं सोपं रूपांतर करावं, काही तसेच स्वीकारून आपली भाषा समृद्ध करावी. अकारण परकीय शब्द आणि व्याकरणात मूलभूत फरक टाळावा. बाकी बोलीभाषांमधले प्रतिशब्दही गोड असतात.

असं म्हणतात की, फोनवर ‘थॉमस एडिसन’ यांनी पहिल्यांदा ‘हॅलो’ शब्द उच्चारला. त्याची उत्पत्ती मूळच्या जर्मन ‘हाला’, ‘होला’ या बोटीसाठी गिऱहाईक मिळवणाऱयांच्या हाकेत आहे. आपल्याकडेही हाकारे ‘‘हल्या हल्या हा’’ म्हणतात. ‘हॅलो’चं स्पेलिंगही ‘हलो’, ‘हॅलो’, ‘हेलो’ असं वेगवेगळं केलं जातं. विख्यात नाटककार विल्यम शेक्सपिअरपासून हा शब्द वापरात आहे. 18 ऑक्टोबर 1836 रोजी अमेरिकेतल्या कनेक्टिकट राज्यातील ‘नॉर्विच कुरिअर’ वृत्तपत्राने हा शब्द छापील केला, त्याला आता 97 वर्षे झाली. टेलिफोनचा शोध लावणाऱया अलेक्झॅन्डर ग्रॅहॅम बेल यांच्या नावातच ‘बेल’ ध्वनित व्हावं हा निव्वळ योगायोग. ‘टेलि’ म्हणजे दूरस्थ आणि ‘फोन’ म्हणजे ‘ध्वनी’ अशा अर्थी वापरला जायचा तो प्राचीन ग्रीक भाषेत. फोन आल्यावर तो त्याला जगभर पसरला नि फोनला कायमचा चिकटला!

टेलिफोन ज्या वैज्ञानिक तत्त्वावर चालतो ते तत्त्व म्हणजे ‘ट्रान्समिशन’ (प्रक्षेपण) आणि रिसिव्हर (ग्रहणकर्ता) यांच्यातील प्रसारण-ग्रहण संपर्क. मायक्रोफोन म्हणजे ट्रान्समीटर आणि इअरफोन हा रिसिव्हर यामध्ये इलेक्ट्रिकल सिग्नलद्वारे ध्वनी संक्रमण होऊन आवाज येतो. ऐकताना त्याचं ‘ऑडिबल’ म्हणजे आपण बोलतो त्या आवाजात रूपांतर होत असल्याने पलीकडच्या व्यक्तीचा आवाज आपल्याला ऐकू येतो. यासाठी ‘दूरध्वनी’ हा शब्द आहे, पण हा नुसता ‘लांबून येणारा ध्वनी’ नव्हे, तर विविक्षित व्यक्तीचा मुद्दाम प्रसारण केलेला आवाज असतो. सुरुवातीला फोनमध्ये हे दोन्ही ‘सेट’वर वेगळे असतं. नंतर काळय़ा रंगाच्या घरच्या फोनमध्ये ते एकाच रिसिव्हरमध्ये आले. ऐकणं आणि बोलणं सोपं झालं. त्यात उक्रांती होत होत आताचे मोबाईल आलेत.

पूर्वी टेलिफोनची ‘वायर’ किंवा ‘केबल’ सर्वत्र जमिनीत टाकावी लागायची. आफ्रिकेतील सब्सी म्हणजे समुद्राखालून जाणारी केबल 45 हजार किलोमीटरची आहे. पॅसिफिक महासागरातही अशा केबल आहेत. सेलफोन किंवा मोबाईलमुळे आता ‘टेलिग्राफ’ आणि ‘लॅन्डलाइन’ टेलिफोनचं महत्त्व संपत आलंय. लिखित ‘पत्र’ तरी आता कुणी कुणाला क्वचितच पाठवत असेल. आता सगळा इलेक्ट्रॉनिक मामला. 25 सें. मी. जाडीच्या (व्यासाच्या) टेलिफोन केबलची प्रचंड लाकडी रिळं (भेंडोळी) आज पन्नाशीत असलेल्यांनी रस्त्यारस्त्यावर पाहिली असतील. नव्या पिढीला उद्या ती तंत्रज्ञान-म्युझियममध्ये पहावी लागतील.

हिंदुस्थानात आधुनिक तंत्रज्ञान पहिल्यांदा मुख्यत्वे मुंबईत आलं. कोलकाता ही इंग्रजांची तत्कालीन राजधानी होती. मात्र मुंबईसारखं विशाल ‘बॅकबे’ असलेलं उत्तम नैसर्गिक बंदर (पोर्ट) देशात दुसरं नाही. शिवाय पश्चिम किनारपट्टीवरून युरोपीय देशांना सुएझ कालवा झाल्यावर ते अधिक जवळ आलं आणि तंत्रज्ञानात्मक आधुनिकता मुंबईने प्रथम अनुभवली.
टेलिफोनच्या शोधाचं श्रेय ऍलॅक्झॅन्डर बेल यांना जात असलं तरी त्या आधी 1860 मध्ये जोहॅन रिस यांनी तसेच त्याच सुमारास बिरेसल, म्युकी अशा अनेकांनी इलेक्ट्रिकल शक्तीद्वारे साऊंड वेव्हज् प्रसारित करण्याचे प्रयत्न केले होते. बेल यांनी 1876 मध्ये अमेरिकेत त्याचं पेटंट घेतलं. पूर्वीच्या टेलिफोन केबल तांबे किंवा ऍल्युमिनियम धातूच्या असत. तरी प्राथमिक स्वरूपाच्या फोनमध्ये खरखर फार यायची. अलेक्झॅन्डर ग्रॅहॅम बेल यांनी सुगम (इन्टेलिजिबल) ध्वनी प्रसारित होईल आणि फोनवरचं बोलणं सुस्पष्ट होईल याची काळजी घेतली.

…आता तर सेलफोन जगभरच्या माणसांचा एक कृत्रिम अवयवच बनला आहे. जगाच्या कोणत्याही भागातल्या व्यक्ती एकमेकांशी संपर्क साधू शकतात. बिनतारी संदेशवहन अंतराळापर्यंत पोचलंय. सॅटेलाइटमधल्या व्यक्तींशीही संवाद होऊ शकतो. जगभरात शाब्दिक संवाद वाढलाय खरा, पण मतमतांतराचा विसंवाद आणि कल्लोळही वाढलाय. तो फोनमधला नाही, तर मनामनातला आहे.