
सामान्य कुटुंबातुन स्वकर्तृत्वावर राजकारणात दबदबा निर्माण करणारे विनायक मेटे यांची राजकीय वाटचाल थक्क करणारी आहे. भाजी विक्रेता, शिपाई, पेंटर, मिळेल ते काम करत मराठा महासंघाच्या माध्यमातून राजकीय पटलावर उदय झालेल्या मेटेंनी मराठा समाजाची मोट बांधली. संघटन कौशल्य आणि बुद्धी चातुर्य या जीवावर विनायक मेटेंनी पाचवेळा विधान परिषदेचे प्रतिनिधीत्व केले.
विनायक मेटे यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षात गेले. एक लढवय्या नेता म्हणून त्यांची ओळख होती. अतिशय सामान्य कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. सामाजिक चळवळीतून त्यांनी आपले एक एक पाऊल पुढे टाकले. केज तालुक्यातील राजेगाव छोट्याशा गावात जन्मलेले विनायक मेटे यांचे प्राथमिक शिक्षण राजेगाव येथेच झाले. इयत्ता नववीपासूनचे शिक्षण नाहोलीत घेतले. इयत्ता दहावीत संपूर्ण शाळेमधून केवळ दोनच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात विनायक मेटे पहिले आले. पुढे त्यांनी बीडच्या केएसके महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना उपजिविकेच्या साधनासाठी छोटी मोठी कामं करू लागले. बीडमध्ये आर्थिक चणचण निर्माण झाली म्हणून कामासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबईत मिळेल ते काम मेटे करू लागले. सुरूवातीला मुंबईत भाजी विकण्याचे काम त्यांनी केले. चेंबूरमध्ये मामाकडे राहत असताना आरसीएफ कंपनीत शिपाई म्हणून नोकरी स्वीकारली. त्यानंतर चप्पल बुटाच्या दुकानातही काम केले. कपड्याच्या मिलमध्ये शिपाई म्हणून काम केल्यानंतर मोठ्या भावासोबत पेंटरच्या कामाल सुरुवात केली. छोटे मोठे टेंडर मिळू लागले. त्या काळात त्यांनी मुंबईत आपले बस्थान बसवायला सुरूवात केली.
इमारतीचे रंगोटीचे काम करत असताना मराठा महासंघाच्या कार्यातून आपले संघटन वाढू लागले. 1995 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांची मराठा महासंघाच्या सरचिटणीसपदी निवड झाली. या काळात मराठा महासंघाच्या चळवळीत त्यांनी प्रभावी काम केले. त्यांची तळमळ, संघटन कौशल्य, आक्रमकपणा पाहून मेटेंचं नेतृत्व फुलत गेलं. मराठा आरक्षण प्रश्नाचे मेटेंनी राज्य पातळीवर नेतृत्व केले. 1995 च्या निवडणुकीत मराठा महासंघाने तत्कालीन विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे यांची भेट घेवून विनायक मेटे यांनी युतीला पाठिंबा दिला. राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर अवघ्या तिसाव्या वर्षी विनायक मेटे विधान परिषदेवर नियुक्त झाले.
अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे ते अध्यक्ष होते. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ आपल्या बुद्धीकौशल्यावर आणि संघटन कौशल्यावर त्यांनी राजकारणात आपला दबदबा निर्माण केला. तब्बल पाच वेळा विधान परिषदेवर ते नियुक्त झाले. 2014 साली पहिल्यांदाच त्यांनी बीड विधानसभा मतदारसंघाची भाजपाकडून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा अल्पशा मताने पराभव झाला. 25 वर्ष आमदार असणाऱ्या मेटेंचे मंत्री होण्याचे स्वप्न मात्र अधुरे राहिले.
अंत्यसंस्कार बीडमध्ये होणार
शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यावर बीडमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांचे पार्थिव शिवसंग्राम भवनात ठेवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

































































