
रत्नागिरी जिल्ह्यात कोविडचे वाढते प्रमाण लक्षात घेता कोविड तपासणीला अधिक वेग यावा यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यासाठी मोबाईल आरटीपीसीआर टेस्ट लॅब दिली आहे.या मोबाईल लॅबमधून दिवसाला दोन हजार चाचण्या करता येणार असून ही मोबाईल लॅब चिपळूण येथे ठेवण्यात येणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.
टास्क फोर्समधील डॉक्टर आणि राज्यातील डॉक्टर यांनी संवाद साधावा. संवादातून कोविड रूग्णांवर उपचार करताना काय खबरदारी घ्यावी याबाबत माहिती टास्क फोर्स राज्यातील डॉक्टरांना देईल. नागरिकांचा फॅमिली डॉक्टरांवर प्रचंड विश्वास असतो. कोविड झाल्यावर रूग्ण फॅमिली डॉक्टरकडे जाऊन उपचार घेतात. दुसऱ्या लाटेत उशिराने कोविडचे उपचार घेतल्याने अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागले.अशावेळी तिसऱ्या लाटेचा विचार करता राज्यातील सर्व डॉक्टरांना कोविडबाबत जागरूक करण्यासाठी टास्क फोर्स आणि राज्यातील सर्व डॉक्टरांचा संवाद ऑनलाईन साधला जाणार आहे. पहिल्या टप्यात मुंबईतील डॉक्टरांशी संवाद होईल साधारण तिसऱ्या टप्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील 1900 डॉक्टर टास्क फोर्सशी संवाद साधतील असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
स्वस्तिक हॉस्पिटल मध्ये कोविड केअर सेंटर – उदय सामंत
डॉक्टर नितीन चव्हाण यांनी रत्नागिरी शहरातील त्यांचे स्वस्तिक हॉस्पिटल कोविड केअर सेंटरसाठी जिल्हा प्रशासनाकडे दिले असून त्या ठिकाणी 45 बेडची क्षमता आहे. हे कोविड केअर सेंटर आपण लवकरच सुरू करत आहोत. जिल्हा क्रीडा संकुल येथे महिलांसाठी कोविड सेंटर सुरू होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. यावेळी उदय सामंत यांनी रत्नागिरी शहरातील नळपाणी योजनेचा आढावा घेताना उर्वरित टप्प्यांची कामे तातडीने करण्याच्या सूचना नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांना दिल्या. तसेच शहरातील रस्त्यांची कामे पुढील चार दिवसात सुरू होतील असे सामंत यांनी स्पष्ट केले.


























































