
हिंदुस्थानची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने पुन्हा एकदा कुस्तीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 2028 मध्ये लॉस एन्जेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त करत तिने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. शुक्रवारी सोशल मीडियावर एक पोस्ट करत तिने ही माहिती दिली.
पॅरीस ऑलिम्पिकमध्ये 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने ती फायनलसाठी अपात्र ठरली होती आणि त्यामुळे पहिले ऑलिम्पिक पदक जिंकण्याच्या तिच्या आशांना सुरुंग लागला होता. त्यानंतर कुस्तीला रामराम करत ती राजकीय मैदानात उतरली होती. तिने काँग्रेसमध्ये प्रवेशही केला होता. त्यानंतर हरयाणामध्ये झालेल्या निवडणुकीत तिला तिकीट मिळाले आणि तिने जुलाना मतदारसंघातून विजय मिळवला होता. विनेशने भाजपच्या योगेश कुमार यांना धुळ चारली होती.
पॅरीस ऑलिम्पिक शेवटचे होते का असे लोक मला विचारत होते. बराच काळ, माझ्याकडे याचे उत्तरच नव्हते. मला मॅटपासून, दडपणापासून, अपेक्षांपासून आणि माझ्या स्वप्नांपासूनही दूर जाण्याची गरज होती. माझ्या प्रवासामध्ये नेमके काय अडथळे आहे समजण्यासाठी मला वेळ द्यावा लागला. मला अजूनही हा खेळ आवडतो. मला अजूनही स्पर्धा करायची आहे, असे विनेश म्हणाली.
माझ्या मनातील धग कधीच विझली नव्हती. थकवा आणि आवाजामुळे ती दडून बसली होती. शिस्त, दिनचर्या आणि लढण्याची तयारी हे माझ्या प्रणालीत असून मी कितीही दूर गेले तरी माझा एक भाग मॅटवरच तयार राहतो. म्हणून मी 2028 मध्ये होणाऱ्या लॉस एन्जलिस ऑलिम्पिकच्या दिशेने पाऊल टाकत आहे. पण यावेळी मी एकटी नसून माझा मुलगाही मला पाठिंबा देण्यासाठी सोबत आहे. माझा छोटा चीअरलीडर माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे, असेही ती म्हणाली.
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) December 12, 2025
दरम्यान, विनेश फोगाट हिने आतापर्यंत तीन ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले आहे. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ती दुखापतीमुळे बाहेर पडली. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिचा उपांत्यपूर्व फेरीतच पराभव झाला होता. त्यानंतर पॅरीस ऑलिम्पिकमध्ये एकही सामना न गमावता तिने फायनल गाठली होती. मात्र फायनलपूर्वी तिचे वजन 100 ग्रॅम जास्त भरल्याने तिला स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले होते.



























































