विनोद शिरसाठ यांना ‘प्रबोधनकार ठाकरे समाज-प्रबोधन’ पुरस्कार, 27 नोव्हेंबरला नागपूर येथे पुरस्काराचे वितरण

मारवाडी फाऊंडेशन, नागपूरच्या वतीने देण्यात येणारा ‘प्रबोधनकार ठाकरे समाज-प्रबोधन पुरस्कार 2025’  लेखक, सामाजिक कार्यकर्ते  विनोद शिरसाठ यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या 27 नोव्हेंबर रोजी पुरस्कार वितरण होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या हस्ते आणि वैद्यकीय संशोधक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील टॅमेरिंड हॉल येथे हा कार्यक्रम होईल.

महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीला उज्ज्वल इतिहास आहे. सांस्कृतिक व सामाजिक परिवर्तनच्या परंपरेत समाजसुधारक व विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी मारवाडी फाऊंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात  समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱया व्यक्तीला प्रबोधनकार ठाकरे समाज-प्रबोधन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार विनोद शिरसाठ यांना मिळाला आहे. विनोद शिरसाठ हे मागील दीड दशकांपासून ‘साधना’ साप्ताहिकात कार्यरत आहेत. 2013 पासून ते  ‘साधना’चे संपादक आहेत.