
#MahaElection विधानसभेच्या निवडणुकांसाठी भाजप नेते विनोद तावडे यांना बोरीवलीमधून उमेदावरी मिळाली नाही. त्यावर पत्रकार परिषद घेऊन तावडे यांनी आपल्या चुकीसाठी आपण आत्मपरीक्षण करत असल्याचे म्हटले आहे. पण सोबत पक्षावर देखील नाराजी व्यक्त केली आहे.
‘मी आत्मपरिक्षण करतोच आहे, मला असं वाटतं की पक्षही याचा विचार करेल. पक्षाचं काही चुकलं असेल तर पक्षही याचा विचार करेल’ असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रीपदाच्या कार्यकाळात आपण अनेक चांगली कामे केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मुंबईतल्या भाषणात त्याचा उल्लेख केल्याची आठवण त्यांनी पत्रकार परिषदेत करून दिली. ‘पण ज्याअर्थी पक्षाने असं वाटलं त्या अर्थी त्यांच्याकडे काहीतरी असेल. तर मी त्यांच्याशी त्यासंदर्भात बोलेन आणि ते जर चुकीचं असेल तर पक्षही दुरुस्त करेल’, असंही विनोद तावडे यावेळी म्हणाले.
असे असले तरी नंतर त्यांनी ‘कुणाचं चुकलं, कुणाचं बरोबर हा विचार करण्याची ही वेळ नाही’, असे म्हणत आपण पक्षासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘आज निवडणुकीच्या काळामध्ये कुणाचं चुकलं, कुणाचं बरोबर हा काही विचार करण्याची ही वेळ नाही. मी संघाचा स्वयंसेवक आहे. माझ्यावर संघ विचाराचे संस्कार आहेत. त्यामुळे राजकारणातही आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि हे करत असताना खरं उद्देश आहे ते म्हणजे राष्ट्राचं निर्माण आणि समाजाचं कल्याण. मग तो आमदार, खासदार कुणीही असो संघविचार सांगतो की आम्हाला समाजहित करायचे आहे’, असे त्यांनी सांगितले.
आपण इतर कुठल्या पक्षात जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
उमेदवारांच्या यादीत नाव नसल्याने आपल्याला अनेक फोन आले. मला तिकीट का मिळालं नाही, याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करेन. पण आता भाजपला या निवडणुकीत जिंकून देण्यासाठी काम करेन, असंही विनोद तावडे यावेळी म्हणाले.
विनोद तावडे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे-
- संघ आणि विद्यार्थी परिषदेचे संस्कार माझ्यावर आहेत.
- नवीन पक्ष स्थापन करण्याचा विचारही माझ्या मनाला शिवू शकत नाही.
- पक्षाचं काही चुकलं असेल तर पक्षही त्यावर विचार करेल.
- मला बोरीवलीमधून तिकीट का नाही दिलं याचं आत्मपरीक्षण मी करतोच आहे.
- निवडणूक झाली की त्यांच्याशी नक्की बोलेन.
- आम्ही एक टीम म्हणून काम करत असतो.
- मला तिकीट मिळालं नाही म्हणून अनेकांचे फोन आले.
- या निवडणुकीत भाजप दोन तृतीयांश मताधिक्यांनी जिंकून यावा, म्हणून काम करत राहणार
- तिकीट का नाही मिळालं याची चर्चा पक्षश्रेष्ठींशी करेन
- खरं उद्दीष्ट हे राष्ट्राचं कल्याण आहे. मग पद कोणतंही असो
- प्रत्येकाची केस वेगवेगळी आहे, पक्ष सांगेल ती भूमिका आम्हाला मान्य आहे
- मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करीत राहणार
- माझ्या चुका आहेत का ? का पक्षाचे काही धोरण आहे हे निवडणुकीनंतर कळेल! तिकीट कापल्यानंतर विनोद तावडे यांची प्रतिक्रिया
- 5 वर्षात भ्रष्टाचाराचा डाग नाही
- पक्षासाठी काम करत राहणार
- जे काम करायचे आहे ते समाजहिताचे करायचे आहे, हे डोळ्यासमोर ठेवून काम करायचे आहे
- निवडणुकीनंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा करता येईल
- चूक कोणाची आहे याचे विश्लेषण करण्याची ही वेळ नाही


























































