तामिळनाडूत उद्रेक! विद्यार्थिनीच्या मृत्यूच्या निषेधार्थ आंदोलक आक्रमक, स्कूल बस व पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामिळनाडू मधील कल्लाकुरिची येथे बारावीत शिकणाऱ्या मुलीच्या मृत्यूच्या निषेधार्थ रविवारी मोठा हिंसाचार घडला आहे. मुलीच्या मृत्यूबद्दल न्याय मागताना आंदोलकांनी शाळेत घुसून, बसेस जाळल्या, शाळेच्या मालमत्तेची तोडफोड केली तसेच पोलिसांच्या देखील गाड्या जाळल्या. रविवारी चिन्ना सालेमजवळील कानियामूर येथील शाळेत सुमारे 2 हजार लोक जमले होते. यावेळी झालेल्या दगडफेकीत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी शाळेबाहेर जमलेल्या आंदोलकांनी पोलिसांच्या तीन वाहनांसह 15 स्कुल बसेस जाळल्या. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते.

बुधवारी चिन्ना सालेमजवळील कनियामूर येथील शाळेच्या वसतिगृहात बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा मृतदेह आढळून आला. यावेळी मृत्यूची नोंद केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कल्लाकुरीची येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला. या मुलीने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये शाळेतील शिक्षकांनी छळ केल्याचा आरोप केला आहे. या मुलीला न्याय मिळावा या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाले होते.

याबद्दल तामिळनाडूचे डीजीपी सी सिलेंद्र बाबू यांनी सांगितले की, या शाळकरी मुलीचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह पुन्हा पोस्टमार्टमसाठी पाठवावा यासाठी पालकांनी हायकोर्टात धाव घेतली. रविवारी काही लोक शाळेत निषेध करण्यासाठी जमले होते. आम्ही त्यादृष्टीने व्यवस्था केली होती. परंतु काही वेळाने मोठ्या संख्येने लोक गोळा झाले. त्यांनी शांततापूर्ण निषेध करण्याऐवजी हल्ले सुरू केले. त्यामुळे आम्हाला लाठीमार करावा लागला. घटनास्थळी आता आणखी 500 पोलिस कर्मचारी पाठवण्यात आले आहेत. शाळेवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली जाणार आहे.