बीडमध्ये मराठा मोर्चाला हिंसक वळण, शांतता राखण्याचे मराठा सुराज्य संघाचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बीड

मराठा क्रांती ठोक मोर्चाचा चौथ्या दिवशीही परळीत ठिय्या आंदोलन सुरु असताना जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. परळी, माजलगाव येथे अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. परळीत तीन बसेसची दगड, वीटा आणि दांडक्यांनी तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी अज्ञातांविरोधात परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान मराठा सुराज्य संघाचे अध्यक्ष प्रणय सावंत यांनी आंदोलकांना शांततेत आणि कोणतीही हिंसा न करण्याचे आवाहन केले आहे. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री सकारात्मक असून, राज्यसरकारच्या मेगाभरतीत मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे आता आंदोलनाला हिंसक वळण न देता आरक्षणाची बाजू न्यायालयात खंबीरपणे कशी मांडता येईल याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. ज्या अठ्ठावन्न मुक मोर्च्यांची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे, त्या मोर्चाना आता हिंसक वळन देउन मराठा मोर्चाची शान घालवूनये असं आवाहन प्रणय सावंत यांनी केले आहे.