चंद्रपुरात हिंसक वळण

तब्बल आठ वर्षांनी होणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिकेसाठी आज मतदान होत असताना शहरात विविध ठिकाणी हिंसक घटनांमुळे निवडणुकीला गालबोट लागले. बंगाली कॅम्प परिसर आणि नेहरू शाळा परिसरात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करण्याची वेळ आली. बंगाली कॅम्प परिसरात 14 जानेवारीच्या रात्री भाजप उमेदवार रॉबिन विश्वास आणि भाजपचे बंडखोर उमेदवार अजय सरकार यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या संघर्षात दोन्ही बाजूंनी महिलांना मारहाण आणि विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत रॉबिन विश्वास आणि अजय सरकार या दोन्ही उमेदवारांवर विनयभंग, मारहाण आणि शिवीगाळीचे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकारामुळे चंद्रपुरात खळबळ उडाली.

नेहरू शाळेत तणाव; पोलिसांचा लाठीमार

नेहरू शाळा मतदान केंद्रावर शिंदे गट आणि भाजप बंडखोर उमेदवारांच्या समर्थकांमध्ये मतदारांना प्रलोभन दाखवण्यावरून मोठा वाद झाला. शिंदे गटाच्या उमेदवार इसमत हुसेन आणि भाजप बंडखोर दीपा कासट यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप करत गोंधळ घातला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले. या दोन्ही संवेदनशील परिसरात आणि मतदान केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान पार पडले.