वाहनांचा व्हीआयपी नंबर आता घरबसल्या मिळणार

नवीकोरी गाडी खरेदी केली की आपल्याला व्हीआयपी नंबर मिळावा हीच प्रत्येक वाहनधारकाची इच्छा असते. त्याची दखल घेत आता परिवहन विभाग व्हीआयपी नंबर देण्याची सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना आपल्या पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक घरसबल्या मिळणार आहे.

राज्यातील विविध आरटीओ कार्यालयांत दररोज आठ-दहा हजार नवीन वाहनांची नोंदणी केली जाते. त्यापैकी अनेकजण व्हीआयपी नोंदणी क्रमांकासाठी प्रयत्नशील असतात. तसेच पाच हजार रुपयांपासून 12 लाखांपर्यंत आरटीओकडून शुल्क आकारणी केली जात. त्यामुळे परिवहन विभागाला मोठा महसूल मिळत आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आरटीओने आपल्या पसंतीचा नोंदणी क्रमांक वाहनधारकांना देण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला असून त्याची सुरुवात आठवडाभरात होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना घरबसल्या व्हीआयपी नंबर बुक करता येणार आहे.