
गेल्या 15-20 दिवसांपासून जिह्यात तापसाथीचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळून येऊ लागले आहेत. स्वाइन फ्लू, कोरोनासह ‘एच3एन2’ने डोके वर काढले आहे. स्वाइन फ्लूचे पाच रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, तर कोरोना रुग्णांची संख्या 40 झाली आहे. आज नवे सहा रुग्ण आढळले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. शिवाय ‘एच3एन2’ची रुग्णसंख्या 21वर गेली आहे.
गेल्या 15-20 दिवसांपासून जिह्यात कोरोनाचे 50हून अधिक रुग्ण झाले होते. गेल्या 24 तासांत जिह्यात कोल्हापूर महापालिकाक्षेत्रात चार, तर हातकणंगले आणि करवीर तालुक्यांत प्रत्येकी एक असे सहा रुग्ण आढळले आहेत. तर, पाचजण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या 40 रुग्णांवर उपचार सुरू असून, यांतील तीन रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, आज इचलकरंजीतील रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, सोमवारी एका दिवसात स्वाइन फ्लूचे सात रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, पाच रुग्ण सध्या ऑक्सिजनवर असल्याची माहिती मिळत आहे. तसेच ‘एच3एन2’च्या रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शहरातील आरोग्यस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सांगलीत कोरोनाचे चार रुग्ण आढळले
सांगली- तब्बल तीन महिन्यांनंतर सांगली जिह्यात आज कोरोनाचे चार रुग्ण आढळून आले. जिह्यात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा सुरू झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. महापालिकाक्षेत्रात एक आणि कडेगाव तालुक्यात तीन रुग्ण आढळून आले आहेत. सध्या 12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांपैकी एक रुग्ण गंभीर आहे.