12 वर्षांची मुलगी धावत्या ट्रेनमधून पडली; देवदूत बनून धावला खाकी वर्दीतील जवान, थरारक व्हिडीओ व्हायरल

धावत्या रेल्वेमध्ये चढू अथवा उतरू नका असे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जाते. रेल्वे स्थानकावर याबाबत उद्घोषणाही सुरू असतात. परंतु, गडबडीमध्ये अनेक प्रवासी आपला जीव धोक्यात घालून धावत्या रेल्वेत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अपघाताला आमंत्रण मिळते. नुकतीच अशी एक घटना राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील गंगापूर सीटी रेल्वे स्थानकावर घडली.

रेल्वे स्थानकावर पाणी पिण्यासाठी उतरलेली 12 वर्षांची मुलगी धावती ट्रेन पकडण्याच्या नादात असानक घसतली आणि थेट मृत्युच्या दारात पोहोचली. परंतु म्हणतात ना, काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. याच स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या एका सतर्क जीआरपी जवानाने स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलीला प्लॅटफॉर्मवर खेचले आणि अनर्थ टळला. हा संपूर्ण थरार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ‘पीटीआय’ने याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 9.30 च्या सुमारास वांद्रे टर्मिनस-हरिद्वार एक्सप्रेस (19019) गंगापूर सिटी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उभी होती. कोटा येथून दिल्लीला प्रवासासाठी निघालेली 12 वर्षीय आराध्या आपल्या आईसोबत ‘एस-1’ कोचमध्ये होती. गाडी थांबलेली असताना ती पाणी पिण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरली. मात्र, आराध्या पाणी घेऊन परतण्यापूर्वीच रेल्वे सुरू झाली आणि रेल्वेने वेग पकडला. आपल्या डोळ्यांसमोर गाडी सुटत असल्याचे पाहून माय-लेकीची धावपळ उडाली. आईने कसाबसा चालत्या गाडीत प्रवेश मिळवला, मात्र घाईघाईत चढताना आराध्याचा पाय घसरला. ती थेट प्लॅटफॉर्म आणि रेल्वेतील जीवघेण्या पोकळीत जाऊ लागली.

नेमक्या त्याच क्षणी प्लॅटफॉर्मवर तैनात असलेले कॉन्स्टेबल रामकेश मीना यांच्या नजरेस हा प्रकार पडला. क्षणाचाही विलंब न लावता ते आराध्याच्या दिशेने धावले. मुलगी रेल्वेखाली जात असतानाच मीना यांनी तिचा हात घट्ट पकडला आणि तिला बाहेरच्या बाजूला ओढले. या प्रयत्नात कॉन्स्टेबल स्वतःही जमिनीवर पडले, पण त्यांनी मुलीची पकड सोडली नाही. जवानाच्या या तत्परतेमुळे आराध्याचा जीव वाचला.

स्थानकावरील प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानंतर तातडीने इमर्जन्सी चैन ओढून गाडी थांबवण्यात आली. जीआरपीचे प्रभारी दलबीर सिंग यांनी सांगितले की, घटनेनंतर मुलीची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सुदैवाने तिला कोणतीही गंभीर दुखापत झाली नव्हती. त्यानंतर तिला सुखरूप तिच्या आईकडे सोपवण्यात आले आणि दोघींना दिल्लीसाठी रवाना करण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून खाकी वर्दीतील देवदूताचे कौतुक होत आहे.