पेट क्लिनिकमधील धक्कादायक प्रकार, श्वानाला लाथाबुक्क्यांनी मारहाण

घोडबंदर रोडवरील पेट क्लिनिकमध्ये उपचारासाठी आणलेल्या श्वानाला तेथील कर्मचाऱयाने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याबाबतचा व्हिडीओ प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मारहाण करणारे मयूर आढाव व त्याचा सहकारी प्रशांत गायकवाड या दोन कर्मचाऱयांना अटक केली आहे.

कासारवडवलीजवळ व्हेटीक नावाचे पेट क्लिनिक आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये त्याच्या शाखा असून मुख्य शाखा दिल्लीत आहे. ठाण्यातील व्हेटीक क्लिनिकमध्ये अनेक जातींच्या श्वानांवर उपचार केले जातात. तसेच श्वानांचे गुमिंगदेखील होते. या ठिकाणी एका पाळीव श्वानाला उपचारासाठी आणले होते. मात्र हा श्वान ऐकत नसल्याचे पाहून तेथील कर्मचारी मयूर आढाव याने संतापाच्या भरात त्याला बुक्क्याने ठोसे मारले. एवढेच नव्हे तर लाथादेखील हाणल्या.

पोलिसांनी ठोकले टाळे

जीवाच्या आकांताने श्वान ओरडत होता, पण कर्मचाऱयाला दया आली नाही. या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच ‘पॉस’ संस्थेचे संस्थापक व प्राणीमित्र नितीन भांगे यांनी तातडीने ठाण्याचे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला. तसेच काही प्राणीमित्रांनीदेखील घटनास्थळी जाऊन या मारहाणीचा तीव्र निषेध केला. त्यानंतर पोलिसांनी व्हेटीक क्लिनिकमध्ये श्वानाला मारहाण करणाऱया दोघांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. दरम्यान, ते क्लिनिक बंद करण्यात आले आहे.