#HappyBirthdayViratKohli ‘रनमशीन’ झाला 32 वर्षाचा, जाणून घ्या खास विक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘किंग कोहली’, ‘रनमशीन’ आणि ‘चिकू’ या नावाने प्रसिद्ध असलेला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याचा आज 32 वा वाढदिवस आहे. 5 नोव्हेंबर, 1988 रोजी जन्मलेल्या विराटची जगातीत महान क्रिकेट खेळाडूंमध्ये गणना होते. जगभरातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असणाऱ्या विराटवर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे.

कमी काळामध्ये आपल्या फलंदाजीने जगभरातील क्रीडाप्रेमींना वेड लावणाऱ्या खेळाडूंमध्ये विराटचा समावेश होते. 18 ऑगस्ट 2008 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा विराट आज 12 वर्षांनी क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मेटमध्ये धावांचा पाऊस पाडत आहे.

टी-20, एक दिवसीय आणि कसोटीमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या विराट कोहलीवर जगभरातील चाहत्यांकडून, क्रीडा खेळाडूंकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

https://twitter.com/BCCI/status/1324177112232853504?s=19

दरम्यान, विराट कोहली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. जाणून घेऊया…

सचिनचा विक्रम मोडला

2018 ला वेस्ट इंडीज विरुद्ध खेळलेल्या एक दिवसीय लढतीत विराटने 10,000 धावा पूर्ण केल्या. विराटने सचिन तेंडुलकर याचा सर्वात जलद 10,000 धावा ठोकण्याचा विक्रम मोडला. विराटने 205 डावात हा पराक्रम केला, तर सचिनने यासाठी 259 डाव घेतले होते.

सलग 3 शतक

2018 ला वेस्ट इंडीज विरुद्ध झालेल्या एक दिवसीय मालिकेत विराटने सलग 3 सामन्यात 3 शतके केली होती. सलग 3 एक दिवसीय सामन्यात 3 शतक करणारा विराट हा पहिला हिंदुस्थानी खेळाडू आहे.

एका कॅलेंडर इयरमध्ये 1000 धावांचा विक्रम

एका कॅलेंडर इयरमध्ये एक दिवसीय सामन्यात 1000 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम विराटने 7 वेळा केला आहे. त्याने 2011, 2012, 2013, 2014, 2017, 2018 आणि 2019 या वर्षी एक दिवसीय क्रिकेटमध्ये 1000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

टी-20 मध्ये जलद 2000 धावा

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटने सर्वात जलद 2000 धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्याने हा विक्रम सर्वात कमी 56 डावात पूर्ण केला आहे.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर 70 शतके आणि 104 अर्धशतके आहेत. तसेच विराटने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 416 सामन्यांत 56.15 च्या सरासरीने 21901 धावा केल्या आहेत.