लाच न दिल्याने मला संघात घेतले नव्हते, कोहलीचा धक्कादायक खुलासा

2109

हिंदुस्थानी संघाचा कर्णधार विराट कोहली हा अत्यंत उच्च प्रतिभेची क्षमता असलेला क्रिकेटपटू आहे. त्याचा खेळ इतका लाजवाब आहे की त्याला जगातील कोणत्याही संघाने एका सेकंदात निवडलं असतं. मात्र क्षमता असूनही लाच न दिल्याने आपल्यावर संघाबाहेर बसण्याची वेळ आली होती असा खुलासा विराट कोहलीने केला आहे. दिल्लीच्या किशोर संघाच्या निवडीच्या वेळी घडलेला हा प्रकार असल्याचे त्याने सांगितले आहे. फुटबॉलपटू सुनील छेत्रीसोबत व्हिडीओसंवादादरम्यान कोहलीने सांगितले की मी खेळत असलेल्या राज्यात म्हणजेच दिल्ली क्रिकेटमध्ये काहीवेळा अशा गोष्टी घडतात ती ज्या योग्य नसतात. एक वेळ अशी आली होती की संघनिवड करताना क्षमतेच्या आधारे निवड केली गेली नव्हती. कोहली म्हणाला की माझ्यामध्ये क्षमता असतानाही संघातील स्थान पक्के व्हावे यासाठी वडिलांकडे लाच मागितली होती.

कोहलीचे वडील हे वकील आहेत. भूतकाळात घडलेल्या प्रकाराबाबत बोलताना विराट म्हणाला की माझे वडील हे प्रामाणिक मध्यमवर्गीय कुटुंबातून आले होते. त्यांना पहिले “आणखी काहीतरी हवे” याचा अर्थ कळाला नव्हता. जेव्हा त्यांना अर्थ कळाला तेव्हा त्यांनी लाच मागणाऱ्याला सांगितले की ‘विराटला निवडायचे असेल तर त्याच्या क्षमतेवर निवडा, मी तुम्हाला आणखी काहीही देणार नाही’. वडिलांच्या उत्तरानंतर माझी संघात निवड झाली नाही.निवड न झाल्याने मी खूप रडलो होतो असं कोहलीने सांगितलं. विराट या मुलाखतीमध्ये म्हणाला की ‘या अनुभवाने मला बरंच काही शिकवलं. यशस्वी बनायचे असेल तर तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनले पाहिजे ही शिकवण मिळाली.’ विराट म्हणाला की यश मिळवण्यासाठी स्वत:ला कष्ट करावेच लागतील आणि माझ्या वडिलांनी शब्दांऐवजी कृतीतून मला योग्य मार्ग दाखवला होता.

विराट 18 वर्षांचा असताना रणची ट्रॉफी स्पर्धा खेळत होता. त्याचवेळी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. 2006 साली दिल्ली विरूद्ध कर्नाटक सामना सुरू असतानाच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. आदल्या रात्री वडिलांना प्राण सोडताना पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोहली मैदानात उतरला होता आणि त्याने महत्वपूर्ण खेळी करत दिल्लीला पराभवापासून वाचवलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या