
टीम इंडियाचा ‘रनमशीन’ विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर विराट पहिल्यांदा मैदानात उतरणार आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला विराट ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे मालिकेत खेळताना दिसणार आहे. 19 ऑक्टोबर दरम्यान या मालिकेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी विराट कोहली याने केलेली एक क्रिप्टिक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
विराट कोहली हा सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणारा खेळाडू आहे. फेसबुक, इन्स्टा, एक्सवर त्याचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत. अनेकदा तो येथे ब्रँडचे प्रमोशन करताना दिसतो. मात्र आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे मालिका सुरू होण्यापूर्वी त्याने एक्स अकाऊंटवर 13 शब्दांची एक छोटेखानी पण मार्मिक पोस्ट शेअर केली आहे. ‘जेव्हा तुम्ही हार मानण्याचा निर्णय घेता तेव्हाच तुम्ही खरोखर अपयशी ठरता’, अशी पोस्ट विराटने केली असून ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
The only time you truly fail, is when you decide to give up.
— Virat Kohli (@imVkohli) October 16, 2025
दरम्यान, विराट कोहली याच्या पोस्टचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला. काहींनी ही पोस्ट सकारात्मक घेतली आहे, तर काहींनी विराट कोहली निवृत्तीच्या दिशेने जात असल्याचे म्हटले. अर्थात हार न मानता लढत राहण्याचा इरादाही यातून स्पष्ट होत आहे. याचा अर्थ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार कामगिरी करून संघातील स्थान कायम ठेवण्याचा आणि 2027 चा वर्ल्डकप खेळण्याचा इरादा यातून स्पष्ट होत असल्याची चर्चा आहे.
ही रोहित–कोहलीची शेवटची मालिका?
‘टीम इंडिया’चे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी नुकतेच सांगितले की, रोहित शर्मा आणि विराट कोहली आगामी मालिकेत चांगली कामगिरी करतील. मात्र 2027 मध्ये होणाऱ्या वन डे विश्वचषकात हे दोघे खेळतील का, याबाबत आताच सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. गंभीर म्हणाले, ‘वन डे वर्ल्ड कप अजून दीड-दोन वर्षांवर आहे. सध्या वर्तमानात राहणे गरजेचे आहे. दोघेही उत्तम खेळाडू आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा ऑस्ट्रेलियात नक्कीच फायदा होईल.’
कठीण दिवस अजून बाकी आहेत; गंभीरकडून गिलच्या नेतृत्वाचं कौतुक, पण इशाराही दिला