विराटने बंगळुरू संघाचेही कर्णधारपद सोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर ‘टीम इंडिया’च्या टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर विराट कोहलीने आपल्या चाहत्यांना आणखी एक धक्का दिलाय. त्याने यंदाच्या आयपीएलनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचेही कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बंगळुरू फ्रेंचायझीने रविवारी याची माहिती दिली.

बंगळुरू संघाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करून विराट कोहली या संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची माहिती दिली.

व्हिडीओमध्ये विराट कोहलीने म्हटले की, ‘आज संध्याकाळी मी संघाशी बोललो आहे. कर्णधार म्हणून ही माझी शेवटची आयपीएल स्पर्धा असेल. ‘मी संघ व्यवस्थापनालाही याबाबत माहिती दिली आहे. कर्णधारपद सोडण्याचा विचार बराच काळापासून माझ्या मनात घोळत होता. अलीकडेच मी टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले. कामाचा ताण कमी करून खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मी हे निर्णय घेतले आहेत’.