T20 वर्ल्डकप नंतर विराट कर्णधारपद सोडणार?

आयसीसीच्या स्पर्धांमधील अपयश… फलंदाजीत सुमार फॉर्म… अन् कर्णधारपदावरून माघार घेण्यासाठी वाढत असलेला दबाव… ही पार्श्वभूमी हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची. या सर्व कारणांमुळे आता हिंदुस्थानचा हा महान फलंदाज व कर्णधार आगामी टी-20 वर्ल्ड कपनंतर झटपट क्रिकेटमधील (वन डे, टी-20) नेतृत्व सोडणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून सोमवारी देण्यात आली. विराट कोहली कसोटी संघाचे नेतृत्व सोडणार नसल्याचेही यावेळी स्पष्टपणे सांगण्यात आले. टीम इंडियाच्या टी-20 व वन डे संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.

फलंदाजीवर लक्ष केंद्रित करणार

सध्या विराट कोहलीच्या खांद्यावर कसोटी, वन डे व टी-20 संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत संघाचे कर्णधारपद भूषवत असतानाच त्याच्यावरील दबाव वाढत चालला आहे. विराट कोहलीला 2019 सालापासून एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे तो फक्त कसोटी संघाचे नेतृत्व आपल्याकडे कायम ठेवणार आहे. तसेच 2022 सालामध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱया टी-20 आणि 2023 सालामध्ये हिंदुस्थानात होणाऱया वन डे वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीला फलंदाज म्हणून हिंदुस्थानसाठी मोलाची कामगिरी करायची आहे. यापुढे त्याला फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे. असे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

संघ व्यवस्थापनासोबत बोलणे झाले

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. तिथपासून विराट कोहलीच्या मनामध्ये वन डे व टी-20 संघाचे नेतृत्व सोडून फलंदाजीवर लक्ष देण्याचा विचार सुरू होता. याबाबत तो संघ व्यवस्थापन व रोहित शर्माशीही बोलला होता. पण ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्धवट संघाची कमान सोडणे उचित ठरले नसते. यामुळे विराट कोहलीने टी-20 वर्ल्ड कपनंतर नेतृत्व सोडण्याला पसंती दाखवली.

तोच राहणार कर्णधार -अरुण धुमळ

बीसीसीआयच्या एका सूत्राकडून विराट कोहली कर्णधारपदावरून माघार घेणार असल्याचे सांगण्यात आले. यानंतर सोशल साइटवर ही बातमी वेगाने पसरली. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमळ यांच्याशी एका वृत्तवाहिनीने संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताचे खंडन केले. यावेळी ते म्हणाले, बीसीसीआयने याबाबत कोणताही विचार केलेला नाही. विराट कोहलीने नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही. टी-20 वर्ल्ड कपनंतरही त्याच्याकडेच नेतृत्व राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या