रोहित आणि हार्दिक ‘मुंबई’त दिसणार नाहीत; वीरूचा आणखी एक स्फोटक दावा

हिंदुस्थानी संघातील रोहित शर्मा, हार्दिक पंडय़ा, जसप्रीत बुमरा, सूर्यपुमार यादव अशी दिग्गज मंडळी असूनही मुंबई इंडियन्सचा साखळीतच बाजार उठला. या मोसमात पंडय़ाकडे सोपवलेले नेतृत्व मुंबई इंडियन्सला चांगलेच भोवले आहे. त्यामुळे संघमालक आगामी मोसमात रोहित शर्मा आणि हार्दिक पंडय़ा या दोन्ही आजी-माजी कर्णधारांना मुक्त करतील, असा धक्कादायक दावा हिंदुस्थानचा माजी स्पह्टक फलंदाज वीरेंद्र सेहवागने केला आहे. मात्र जसप्रीत बुमरा आणि सूर्यपुमार यादव या दोघांना संघात कायम ठेवतील असा विश्वासही व्यक्त केला आहे.

रोहित शर्माकडे नेतृत्व काढून घेणे संघमालकांसाठी फारच त्रासदायक ठरले आहे. पूर्ण मोसमात संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे हार्दिक पंडय़ा आणि संघमालक टीकेचे धनी झाले. पंडय़ाला कर्णधार केल्यानंतर मुंबईचे चित्र बदलेल, असा समज झालेल्या संघमालकांना आता खूप मोठा पश्चात्ताप झाला आहे. या मोसमात मुंबई 14 सामन्यांपैकी केवळ 4 सामन्यांतच विजय मिळवू शकला आहे. म्हणजे तब्बल दहा सामन्यांत हार. मुंबईची ही आजवरची सर्वात निराशाजनक कामगिरी आहे.

आपल्या स्पह्टक वक्तव्यांनी सेहवाग नेहमीच सनसनाटी निर्माण करतो. आजही त्याने एका क्रिकेट वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुंबईच्या पराभवानंतर आणखी काही धक्कादायक होणार असल्याचे संकेत दिले. तो म्हणाला, मुंबईच्या संघात अनेक दिग्गज नावे आहेत, मात्र ती कागदावरच राहिली. जणू कागदाचे वाघ. रोहितने एकच शतक झळकावले, तर इशानचा हंगाम केवळ पॉवर प्ले पुरताच मर्यादित राहिला. हार्दिक नेतृत्व, फलंदाज आणि गोलंदाज या तिन्ही आघाडय़ांवर अपयशी ठरला. त्यामुळे पुढील हंगामात हार्दिक आणि रोहित यांना संघमालक रिलीज करू शकते, असे भाकीत त्याने वर्तवले, मात्र बुमरा आणि सुर्यपुमार यांना संघात कायम ठेवू शकते, असा दावा केला.  हिंदुस्थानचा माजी फलंदाज मनोज तिवारीनेही वीरूच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. मुंबईचे व्यवस्थापक बुमरा किंवा सूर्यपुमारकडे भविष्यातील कर्णधार म्हणून पाहतील, असे तिवारी म्हणाला.