
>> विशाल फुटाणे
छत्तीसगडमधील देवराणी मंदिर परिसरात सापडलेली मौन मूर्ती प्राचीन भारतीय धार्मिक चेतनेचे मूलभूत सत्य सांगते.भारतीय धार्मिक विचारसरणीत मानव हा निसर्गाचा अधिपती नसून निसर्गाचाच एक अविभाज्य भाग आहे, ही भूमिका या मूर्तीच्या प्रत्येक रेषेतून प्रकट होते.
जानेवारी 1988 मध्ये छत्तीसगडमधील देवराणी मंदिर परिसरात उत्खनन सुरू असताना मंदिराच्या मुख्य दरवाजासमोर जमिनीखाली सुमारे सहा फूट खोल एक भव्य, रहस्यमय मूर्ती सापडली आणि भारतीय धार्मिक पुरातत्व क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली.
दक्षिणेकडे मुख करून पालथी पडलेली ही मूर्ती गुप्तकालीन असल्याचे अभ्यासकांचे मत असून ती पंधराशे वर्षे जुनी आहे. नऊ फूट उंच आणि सुमारे पाच टन वजनाची ही शिल्पकृती पाहताच लक्षात येते की, ही एखाद्या सर्वसाधारण देवप्रतिमेची निर्मिती नाही, तर अत्यंत सखोल धार्मिक, तांत्रिक आणि तात्त्विक विचारांमधून साकारलेली अद्भुत संकल्पना आहे. या मूर्तीचे महाकाल पशुपती असे अनुमानाधारित नामकरण करण्यात आले आहे. कारण मूर्तीमध्ये बारा राशी आणि नऊ ग्रह यांचा समावेश असून तिचे स्वरूप शिवाच्या सौम्य रूपापेक्षा रौद्र, उग्र आणि व्यापक विश्वात्मक रूप व्यक्त करते. येथे महादेव केवळ देवतांचे स्वामी म्हणून उभे राहत नाहीत, तर ते संपूर्ण प्राकृतिक आणि पाशवी शक्तींचे अधिपती म्हणून समोर येतात. भारतीय परंपरेतील ‘पशुपती’ ही संकल्पना केवळ प्राण्यांचा स्वामी एवढय़ापुरती मर्यादित नसून सर्व सजीव, मूलभूत प्रवृत्ती, आदिम शक्ती आणि निसर्गातील उग्र ऊर्जा यांचे नियंत्रण व संतुलन साधणारा अधिपती असा तिचा अर्थ आहे.
देवराणी येथील मूर्ती ही याच पशुपती तत्त्वज्ञानाची शिल्पात्मक मांडणी असल्याचे स्पष्टपणे दिसते. शिल्पकाराने पशुपतीच्या शरीररचनेत मानव, प्राणी, पक्षी, जलचर आणि सरपटणारे जीव यांचे विलक्षण एकत्रीकरण केले आहे. हातांची बोटे सापाच्या मुखासारखी घडवली असून मिशा लहान लहान माशांच्या आकारात कोरल्या आहेत, दोन्ही गुडघ्यांवर सिंहाची मुखकृती आहे, तर शरीराच्या विविध अवयवांत सरडा, मासा, खेकडा, मोर, नाग, कासव आणि सिंह यांसारख्या अनेक जिवांचे प्रतीकात्मक रूप दिसून येते. हे केवळ शिल्पकलेचे कौशल्य नाही, तर प्राचीन भारतीयांच्या निसर्गविषयक धार्मिक धारणा आणि भूतदयेची सखोल जाणीव व्यक्त करणारी दृष्टी आहे. भारतीय धार्मिक विचारसरणीत मानव हा निसर्गाचा अधिपती नसून निसर्गाचाच एक अविभाज्य भाग आहे, ही भूमिका या मूर्तीच्या प्रत्येक रेषेतून प्रकट होते.
पशुपती म्हणून महादेव सर्व पाशवी प्रवृत्ती नष्ट करत नाहीत, तर त्या आत्मसात करून त्यांचे रूपांतर करतात, संतुलन साधतात आणि सृष्टीचा प्रवाह टिकवून ठेवतात, ही तात्त्विक भूमिका या मूर्तीच्या रौद्र पण समन्वयी स्वरूपातून व्यक्त होते. इतकी गुंतागुंतीची, प्रतीकांनी भरलेली आणि तत्त्वज्ञानाशी नाते सांगणारी मूर्ती कोणत्याही शिल्पकाराच्या स्वैर कल्पनेतून निर्माण होणे अशक्य असून तिच्यामागे शैव आगम, पाशुपत परंपरा किंवा आज लुप्त झालेल्या एखाद्या तांत्रिक ग्रंथाचा आधार असावा, असा तर्क अभ्यासक मांडतात. विशेष म्हणजे ही मूर्ती ज्या प्रदेशात सापडली तो भाग प्राचीन काळी तांत्रिक साधनेचा प्रभाव असलेला मानला जातो आणि त्यामुळे येथे शिवाच्या सौम्य नव्हे, तर उग्र व रौद्र रूपाची उपासना प्रचलित असावी.
तंत्र म्हणजे केवळ गूढ किंवा भयावह विधी नव्हे, तर निसर्गातील सूक्ष्म, उग्र आणि अनियंत्रित शक्तींशी थेट संवाद साधण्याचे शास्त्र होते आणि त्या दृष्टीने ही मूर्ती सृष्टीच्या अराजकतेतून संतुलन निर्माण करणाऱया शक्तीचे प्रतीक ठरते. मूर्ती दक्षिणेकडे तोंड करून पालथी अवस्थेत सापडणे हा योगायोग नसून ती जाणूनबुजून भूमीत गाडली गेली असावी, असा संशय व्यक्त केला जातो. मात्र त्यामागील नेमके कारण धार्मिक संघर्ष, संप्रदायांतील बदल, राजकीय उलथापालथ किंवा तांत्रिक परंपरेचा ऱहास याबाबत आजही ठोस निष्कर्ष उपलब्ध नाही. या मूर्तीची कोणत्याही मंदिरात नियमित पूजा होत असल्याचा पुरावाही आढळून आलेला नाही. त्यामुळे ती एखाद्या विशिष्ट तांत्रिक समूहाची उपास्य प्रतिमा असावी किंवा कालविशेषी, विधीविशेषी पूजली जाणारी प्रतीकात्मक मूर्ती असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो.
पुरातत्त्व विभागालाही त्या काळी या मूर्तीचे अचूक नाव निश्चित करता आले नाही आणि त्यामुळे तिचे नामकरण केवळ अनुमानाच्या आधारावर करण्यात आले. तरीही देवराणी मंदिरासमोरील ही मौन मूर्ती आज आपल्याला प्राचीन भारतीय धार्मिक चेतनेचे एक मूलभूत सत्य सांगते ही चेतना मानवकेंद्री नसून सृष्टीकेंद्री होती, जिथे प्राणी, पक्षी, जलचर आणि इतर जीव हे देवतेचे दागिने नव्हते, तर देवतेचेच अविभाज्य स्वरूप मानले जात होते. आज पर्यावरण, सहअस्तित्व, जैवविविधता आणि निसर्गसंवर्धनावर आपण चर्चा करतो. मात्र त्याची बीजे भारतीयांनी पंधराशे वर्षांपूर्वीच दगडात कोरून ठेवली होती आणि देवराणी येथील ही अद्भुत पशुपती मूर्ती त्या प्राचीन, सखोल आणि प्रगल्भ धार्मिक जाणिवेची जिवंत साक्ष देत आजही इतिहासाच्या मौनातून आपल्याशी संवाद साधत आहे.
(लेखक इतिहास व पुरातत्त्व संशोधक आहेत.)
[email protected]





























































