
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेले जुने सोन्या-चांदीचे दागिने वितळवून त्यातून नवीन दागिने करण्यात येणार आहेत. यासाठी मंदिर समितीने शासनाच्या न्याय व विधी विभागाकडे 19 किलो सोन्याचे आणि 425 किलो चांदीच्या वस्तू वितळवून त्यातून नवीन अलंकार करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यास शासनाने परवानगी दिली आहे. कार्तिकी यात्रेनंतर शासनाच्या निर्देशानुसार मुंबई येथील रिफायनरीत सोने वितळवण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
देश-विदेशातील भाविक दर्शनाला आल्यानंतर श्री विठुरायाच्या चरणी सोन्या-चांदीचे दागिने अर्पण करतात. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात 1985 पासून भाविकांनी सोने आणि चांदीच्या अनेक लहान-मोठय़ा वस्तू, दागिने अर्पण केले आहेत. हे सर्व दागिने आणि वस्तू पोत्यात भरून ठेवायची वेळ समितीवर आली आहे. हे सोन्या-चांदीचे दागिने आणि वस्तू वितळविण्यात येणार आहेत. यासाठी शासनाने परवानगी दिली आहे.
कार्तिकी यात्रेनंतर 20 ते 25 नोव्हेंबर दरम्यान मुंबई येथे सोने-चांदी वितळविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. भाविकांनी दान स्वरूपात अर्पण केलेल्या लहान वस्तू आणि दागिने वर्षानुवर्षे साठवून ठेवण्यात आले आहेत. अशा सोन्याच्या वस्तू एकत्र करून त्यांची वीट तयार करावी, अशी भूमिका मंदिर समितीच्या सदस्यांनी घेतली होती. 2015 पासून त्या संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार सुरू होता. 2018 मध्ये शासनाने परवानगी दिली होती; परंतु प्रत्यक्षात कार्यवाहीला उशीर झाला. यातच कोरोनाचे संकट आले, त्यामुळे ही प्रक्रिया रेंगाळत राहिली होती.
मंदिर समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत देवाला घालण्यासाठी ‘त्या’ सोन्या-चांदीतून अलंकार तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मंदिर समितीचे माजी कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी शासनाकडे यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या बदलीनंतर नूतन कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार शासनाने मंदिर समितीस सोने-चांदी वितळविण्यास परवानगी दिली आहे.
प्रक्रियेसाठी सुभाष कऱ्हाळे यांची समिती नियुक्त
दागिने वितळविण्याच्या प्रक्रियेसाठी शासनाने न्याय व विधी विभागाचे सहसचिव सुभाष कऱहाळे यांची नियुक्त केली आहे. त्यांच्यासह समितीचे तीन सदस्य, कार्यकारी अधिकारी हे वितळवण्यासाठीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची यादी अंतिम करतील. पंढरपूर येथून मुंबईत शासनाच्या रिफायनरीमध्ये सोने-चांदी जमा केली जाणार आहे. तेथे तपासणी करून त्याच्या नोंदी करून वितळवून त्याच्या विटा तयार केल्या जातील. वितळवलेल्या सोन्या-चांदीपासून कोणते दागिने बनवायचे याचा निर्णय बैठकीत घेतला जाणार आहे.
19 किलो सोने, 425 किलो चांदी वितळविणार
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे एकूण 28 किलो वजनाचे सोन्याचे अलंकार आहेत. त्यापैकी जुने दागिने तसेच ठेवण्यात येणार आहेत. एकूण 28 किलो सोन्यापैकी सुमारे 19 किलो सोन्याचे छोटे दागिने आणि वस्तू तसेच एकूण 996 किलो चांदीपैकी 425 किलो चांदी वितळवण्यात येणार आहे. तर, उर्वरित 571 किलो चांदीचा वापर देवासाठी केला जाणार आहे.


























































