
>> विठ्ठल देवकाते
सचिन रमेश तेंडुलकर या महानायकाची तब्बल 24 वर्षं रंगलेली क्रिकेटची मैफल चाहत्यांनी तल्लीन होऊन बघितली. वयाच्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलेला या महारथी फलंदाजाने वयाच्या चाळिशीपर्यंत जगभरातील क्रिकेटची मैदानं गाजवली. नऊ वर्षांपूर्वी म्हणजे 16 नोव्हेंबर 2013 रोजी क्रिकेटच्या या देवदूताने वानखेडेच्या खेळपट्टीला अखेरचा दंडवत घातला तेव्हा स्टेडियमवर व टीव्हीपुढे डोळे लावून बसलेल्या कोट्यवधी क्रिकेटवेड्या चाहत्यांना हुंदके अन् अश्रू अनावर झाले होते. विक्रमांचे इमले रचणार्या सचिनने एव्हरेस्टहून मोठी उंची गाठल्यानंतर नम्रता, विनयशीलता व निगर्वीपणा या सुसंस्कृतपणाच्या जोरावर क्रिकेटलाही नव्या उंचीवर नेलं. क्रिकेटच्या या विश्वविक्रमादित्याचा सोमवारी सुवर्णमहोत्सवी (50 वा) जन्मदिवस होय. वयाचं ‘अर्धशतक’ ठोकणार्या सचिन तेंडुलकरच्या आठवणी जागविण्यासाठीचा हा लेखप्रपंच.
24 एप्रिल 1973 मध्ये मुंबईत एका मध्यमवर्गीय प्राध्यापकाच्या घरात जन्मलेल्या सचिन तेंडुलकरने वयाच्या 16व्या वर्षी म्हणजे 15 नोव्हेंबर 1989 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल ठेवलं, तेही पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध. तेव्हा ओठांवर मिसरूडही न फुटलेल्या या पोराला पाहून पाकिस्तानी खेळाडू पोट धरून फिदीफिदी हसले होते. मात्र, रमाकांत आचरेकर यांच्या या शिष्याने याच दौर्यात अब्दुल कादिरला सांगून षटकार खेचला व हसणार्यांचे दात घशात घातले. त्यानंतर अल्पावधीतच त्याने आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीच्या जोरावर अवघ्या क्रिकेटविश्वावर मोहिनी घातली. मुंबईपासून मेलबर्न, लाहोरपासून लॉर्ड्स, दिल्लीपासून दरबान, कोलंबोपासून वेलिंग्टन, शारजापासून बार्बाडोस, हरारेपासून ढाका अशी क्रिकेटच्या दुनियेतील सगळी मैदानं त्याने आपल्या बॅटने गाजवली. बॉलबॉयपासून क्रिकेटचा श्रीगणेशा केल्यानंतर एकामागून एक विक्रम सचिनच्या पायावर लोळण घेऊ लागली. मग हाच सचिन क्रिकेटजगतात ‘वंडरबॉय’, ‘मास्टर ब्लास्टर’ आणि ‘ग्रॅण्डफादर’ अशा नानाविध उपाधींनी गौरवला गेला. 2011मध्ये ‘टीम इंडिया’ने वन डेचं जगज्जेतेपद पटकावल्यानंतर सचिनच्या क्रिकेट कारकिर्दीचं वर्तुळ खर्या अर्थाने परिपूर्ण झालं. या वामनमूर्तीच्या विक्रमांच्या आसपास पोहोचेल असा एकही क्रिकेटपटू आजही दिसत नाही. त्यामुळेच विक्रमांच्या ‘एव्हरेस्ट’वर विराजमान असलेल्या हा ‘मास्टर ब्लास्टर’ जिवंतपणीच दंतकथा बनला.
#HappyBirthdaySachin विराटने कितीही धावा करु द्या, सचिनचे ‘हे’ 4 विक्रम मोडणे केवळ अशक्य
आपला जन्मच जणू क्रिकेटसाठी झाला आहे, असं मानूनच सचिन क्रिकेट खेळला, किक्रेट जगला आणि हेच त्याच्या यशाचं खरं रहस्य ठरलं. ‘क्रिकेट एके क्रिकेट’ हाच फोकस दोन दशकांहून अधिक काळ डोळ्यांसमोर ठेवल्यानेच तो क्रिकेटजगताचा विक्रमादित्य बनू शकला. फिटनेस, दुखापत, बॅड पॅच असे अनेक अडथळे इतरांप्रमाणेच सचिनच्याही वाट्याला आले. बॅड पॅचमध्ये असताना अनेकांनी सचिनला ‘निवृत्त हो’ असा आगाऊ सल्ला दिला; परंतु तरीही तो कधी खचून गेला नाही. हेच तर महान खेळाडूचं लक्षण असतं. म्हणूनच डॉन ब्रॅडमननंतर सचिन हा क्रिकेटच्या दुनियेचा ‘डॉन’ बनला.
अवघं क्रिकेटविश्वच सचिन तेंडुलकरवर फिदा असण्याचं कारण म्हणजे त्याच्यातील नम्रपणा. कुठल्याही वादात तो कधी अडकला नाही. वेळ येईल तेव्हा फक्त आपल्या बॅटने बोलला. पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटकाही सचिनलाच बसला, हे इतिहास सांगतो. मात्र, असं दुर्दैवीरीत्या बाद होऊनही त्याने आकांडतांडव तर सोडाच, पण पंचांकडे साधं कलुशितपणे पाहिलंही नाही. यशाच्या शिखरावर असताना तो कधी उतला नाही, मातला नाही, घेतलेला वसा त्याने कधी टाकला नाही. म्हणूनच सचिनची 24 वर्षांची क्रिकेट कारकीर्द खर्या अर्थाने सफलसंपूर्ण झाली.
Sachin Tendulkar पाकिस्तान संघाकडूनही क्रिकेट खेळलाय सचिन, ते देखील हिंदुस्थानविरुद्ध!
वानखेडेवरील सचिनचा ‘शाही’ निरोप सोहळा बघताना जगभरातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या डोळ्यांच्या कडा नकळत ओलावल्या. कारकिर्दीच्या अखेरच्या भाषणात त्याने आपले कुटुंबीय, प्रशिक्षक, मित्र, संघसहकारी, एमसीए, बीसीसीआय आणि तमाम क्रिकेटप्रेमींबद्दल कृतज्ञता व्यक्त करून चाहत्यांचा काळजाचा ठाव घेतला.
क्रिकेटमधील साधनेच्या जोरावर पहिलं आंतरराष्ट्रीय वन डे द्विशतकही सचिन तेंडुलकरनेच ठोकलं. आजपर्यंत कोणालाही न जमलेला शंभर आंतरराष्ट्रीय शतकं ठोकण्याचा विश्वविक्रमही सचिनने करून दाखवला आहे. कोट्यवधी क्रिकेटरसिकांसाठी ‘महानायक’ असलेल्या सचिन तेंडुलकरने आयुष्याचंही ‘शतक’ साजरं करावं, यासाठी त्याला मन:पूर्वक शुभेच्छा!
Sachin Tendulkar सचिन तेंडुलकरचे हे 9 विक्रम मोडणं जरा कठीणच, वाचा सविस्तर…


























































