चंदन ड्रग्ज प्रकरण – विवेक ओबेरॉयच्या पत्नीची चौकशी होणार; कर्नाटक पोलिसांची नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकातील चंदन ड्रग्ज प्रकरणात बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉयची पत्नी प्रियांकाची चौकशी होणार आहे. प्रियंकाचा भाऊ आदित्य अल्वा हा चंदन ड्रग्ज प्रकरणात आरोपी असून तो सध्या फरार आहे. तो प्रियांकाच्या संपर्कात होता. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी बंगळूरू क्राईम ब्रॅन्चने प्रियांकाला नोटीस पाठवली आहे. पोलिसांनी गुरुवारी विवेक ओबेरॉयच्या मुंबईतील घरावर छापा टाकला होता. त्यामुळे ओबेरॉय कुटुंबाची चिंता चांगलीच वाढली आहे.

चंदन ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आदित्य हा कर्नाटकचे दिवंगत मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे. तसेच तो अभिनेता विवेक ओबेरॉयचा मेहुणा आहे. आदित्य हा विवेकच्या घरी लपल्याची गुप्त माहिती बंगळूरू पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे न्यायालयाकडून वॉरंट मिळवून पोलिस पथकाने गुरुवारी दुपारी विवेकच्या मुंबईतील घरावर छापा टाकला होता. त्यावेळी विवेक व प्रियांका या दोघांकडे आदित्यबाबत विचारपूस करण्यात आली. आदित्यच्या फरार होण्यामागे प्रियांकाचा हात असण्याचा संशय आल्याने क्राईम ब्रॅन्चने तिला चौकशीसाठी नोटीस बजावली आहे.

काय आहे प्रकरण?
आदित्य अल्वाची आई नंदिनी यांच्या मालकीच्या बंगळूरूतील जमिनीवर पोलिसांनी गेल्या महिन्यात छापा टाकला होता. त्यावेळी ड्रग्ज प्रकरणात कन्नड कलाकार रागिनी द्विवेदी, संजना गलरानी यांच्यासह 15 जणांना अटक करण्यात आली. सिनेसृष्टीतील या लोकांना आदित्य अल्वाने ड्रग्ज पुरवल्याचा आरोप आहे. पोलिसांना आपल्यावर संशय आल्याचे कळल्यापासून आदित्य फरार आहे.