
>> विवेक दिगंबर वैद्य
रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील आंगवली गावानजीक असलेलं शंभू महादेवाचं मंदिर म्हणजे श्री मार्लेश्वर देवस्थान. आंगवली गावचा हा शंभू महादेव सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये अंतर्धान पावला आणि धारेश्वर धबधब्यानजीक श्री मार्लेश्वराच्या रूपात कसा प्रगट झाला हे सांगणारी ही कथा.
संगमेश्वर तालुक्यात वसलेल्या ‘आंगवली’ नामक खेडेगावात घडलेली ही घटना. प्रत्येक गावामध्ये असावयासच हवे असे श्री शिवशंकराचे स्थान ‘आंगवली’ गावातही मंदिररूपाने स्थापित होते. गावाचा रक्षणकर्ता म्हणून या शंभू महादेवाला इथले ग्रामस्थ अड-नड, अडचणी सांगत असत आणि प्रचीतीची साक्ष पटल्याने शिवभक्तीत लीन होत असत. गाव तसेच पंचक्रोशीचा तारणहार म्हणून या महादेवाकडे अपेक्षेने पाहिले जात असे. मात्र भक्तांच्या सततच्या आशा-अपेक्षांचा सामना करावयास लागल्यामुळे कंटाळलेल्या महादेवाने ‘आंगवली’ गावातून निघून जाण्याचे ठरविले आणि रात्रीच्या निवांतसमयी ते आपली वास्तू आणि गावाचे शिवार सोडून दूर चालते झाले.
‘आंगवली’ गावातील गजबजाटास कंटाळून जटाधारी साधूपुरुषाच्या वेषात शंभू महादेव सह्याद्रीच्या दिशेने निघाले. मात्र काही अंतर दूर जाऊन मुरादपूर गावापाशी पोहोचताच त्यांच्या मनात अचानक भक्तांची परीक्षा घेण्याचा विचार आला. डोंगररांगांतून चालत जात असताना कुणीतरी सोबतीला असावे या हेतूने ते ग्रामस्थांना हाका मारू लागले. मध्यरात्र उलटून गेली होती त्यामुळे ग्रामस्थ मंडळी पार झोपेत होती. त्यामुळे शंभू महादेवाची हाक कुणाही ग्रामस्थाच्या कानापर्यंत पोहोचली नाही. रात्रीच्या त्या शांत, धीरगंभीर आसमंतातून आपल्या हाकेला कुणीतरी ‘ओ’ देईल याची वाट पाहात शंभू महादेव काही काळ थांबले. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न आल्याने ते पुढे मार्गक्रमणा करते झाले.
जटाधारी साधूपुरुषाच्या वेषातील शंभू महादेवांनी मुरादपूर गाव ओलांडले, इतक्यात त्यांनी गावाच्या सीमेवर असलेल्या एका झोपडीत मिणमिणता दिवा जळत असलेला पाहिला. ते लगबगीने त्या झोपडीपाशी गेले तेव्हा एक व्यक्ती वहाणा बांधण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी पाहिले. तो एक श्रद्धाळू गरीब शिवभक्त होता. शंभू महादेवांनी त्याला हाक मारली. ‘इतक्या रात्री कोण आले असावे?’ याचा अंदाज घेत तो माणूस झोपडीतून बाहेर आला तेव्हा त्याला त्या अंधुकशा प्रकाशात समोर एक जटाधारी साधुपुरुष उभा असल्याचे दिसले.
हा साधुपुरुष कदाचित वाट चुकून इथवर आला असावा असे वाटल्याने तो शिवभक्त शंभू महादेवांजवळ तशी विचारणा करता झाला. तेव्हा साधूपुरुषाच्या वेषातील महादेव त्याला म्हणाले, ‘रात्रीची वेळ असल्याने मला योग्य दिशा उमगत नाहीये. मला समोरच्या डोंगरावर जायचे आहे. तेव्हा तू माझी साथसोबत करशील का? तू माझ्यासोबत आल्यास तुझे उपकार मी कायमच स्मरणात ठेवेन.’ साध्याभोळ्या श्रद्धाळू शिवभक्ताने काही न बोलता घरातून मशाल घेतली आणि साधुपुरुषास आपल्यासोबत येण्याची खूण करून दोघेजण डोंगरवाटेच्या दिशेने चालू लागले. किर्र अंधारी रात्र, घनदाट जंगल आणि अतिशय बिकट कडेकपारीतून खोलवर, नजरेस ठाव न लागणाऱया आणि भयचकित करणाऱया दऱयाखोऱयातून मजल दरमजल करीत ते दोघेजण मार्ग आक्रमू लागले.
मार्गक्रमणा करीत असताना एकाएकी पाण्याचे अगणित तुषार त्या दोघांचेही अंग भिजवते झाले. श्रद्धाळू शिवभक्त मशालीच्या उजेडात पुढे होऊन पाहतो पर्वतांचे बेलाग कडे आणि त्यातून उफाळून ओसंडणारा धबधबा त्यांचा मार्ग अडवीत उभा ठाकला होता. याहून अधिक पुढे जाणारी वाट दिसत नसल्याचे साधूपुरुषाच्या वेषातील शंभू महादेवानेही जाणले. त्याने सहृदयी वाटाडय़ाकडे कृतज्ञतापूर्वक पाहिले आणि एकाएकी तो मूळ रूपात प्रकट झाला. चोहोबाजूने अंधाराचे साम्राज्य असलेल्या त्या आसमंतात प्रकाशाचा कल्लोळ पसरला आणि त्या श्रद्धावंत शिवभक्ताला त्याने केलेल्या मदतीचे फल प्राप्त करून देण्यासाठी शंभू महादेवाने आपल्या मूळ रूपाचे दर्शन घडविले.
साक्षात श्रीशंकराच्या दर्शनाचा भाग्ययोग अनपेक्षितरीत्या प्राप्त झाल्याने कृतार्थ झालेला शिवभक्त दुसऱया दिवशी सकाळी घरी परतला. त्याच सुमारास ‘आंगवली’ गावातील शिवमंदिरात पूजेसाठी गेलेल्या गुरवाने गाभाऱयातील शिवपिंडी नाहीसे झाल्याचे पाहिले. हा हा म्हणता, ही बातमी गावात आणि पंचक्रोशीतही पसरली. ‘चोर झाला म्हणून दगडाची शिवपिंडी का व कशाला नेईल?’ यावर उलटसुलट चर्चा होऊ लागली. लोक चिंतातुर झाले आणि श्री शंभू महादेवाचा धावा करू लागले. ‘आपल्या हातून काही चूकमाक घडल्यास माफ कर’ असे विनवू लागले. समस्त गावकरी अवतीभवती शिवपिंडीचा शोध घेते झाले, परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश लाभले नाही. पुढे एके रात्री, मंदिरातील गुरवास साक्षात्कार घडला. त्याच्या स्वप्नात प्रकट होऊन श्रीशिवशंकरांनी त्यास, ‘मी हे स्थान सोडून गेलो आहे, कारण इथला गजबजाट मला नकोसा झाला होता. तेव्हा, मी सध्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये एका निर्जन ठिकाणी आश्रय घेतला आहे,’ असे सांगितले.
गुरवाकडून ही गोष्ट ग्रामवासीयांना समजली तेव्हा गावकरीदेखील आश्चर्यचकित झाले. आपल्या गावातील दैवत आपल्याच त्रासामुळे दूर निघून जावे या पश्चातापदग्ध अवस्थेत त्यातील अनेकजण पर्वतरांगा उपसून काढण्याच्या कामगिरीवर निघाले. काहीही करून आपला देव पुन्हा शोधून आणायचाच या हेतूने त्यांनी जंगल, दऱया-खोरे आणि पर्वताचा दृश्य-अदृश्य भूभाग पालथा घातला. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. असे अनेक दिवस, महिने आणि वर्षे निघून गेली, कित्येक पिढय़ा सरल्या. त्यानंतर ग्रामस्थांनाही घडल्या घटनेचे विस्मरण झाले असावे. कारण श्री शंभू महादेवाचा शोध घेण्याचे कार्य हळूहळू मंदावत गेले आणि अखेरीस कायमचे विस्मृतीत जमा झाले.
‘आंगवली’नजीक असलेल्या महिमतगडाच्या आजूबाजूचा भाग मुस्लिम राजवटीत मोगलांच्या अखत्यारीत होता. अठराव्या शतकाच्या मध्यातील ही घटना. ‘आंगवली’ गावातील सरदार अणेराव ऊर्फ साळुंखे घराण्यातील मंडळी, सह्याद्री पर्वतरांगांतील घनदाट जंगलात शिकारीसाठी अर्थात ‘पारध’ करण्यासाठी जात असत तेव्हा, त्यांच्यासोबत काही चपळ गावकरी आणि शिकारी कुत्रेदेखील असत. एकदा ही मंडळी ‘पारध’ करण्यासाठी गेली. मात्र, शिकारीच्या निमित्ताने झालेल्या धावपळीत त्या सर्वांना तहान लागली. आजूबाजूस कुठेही पाण्याचा थेंबही दिसत नव्हता. या कारणाने, तहानेने व्याकुळलेले ते सर्वजण पाण्याचा शोध घेत इथे तिथे फिरू लागले.
(क्रमशः)
[email protected]



























































