युक्रेनविरूद्ध युद्ध सुरू झाल्यापासून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन हे विविध संकटांनी घेरले गेलेले आहेत. युक्रेन सारख्या देशाने बलाढ्य रशियाला कडवट झुंज दिली असून यामुळे रशियाची जगभर नाचक्की झाली आहे. रशियावर या युद्धामुळे बरेच निर्बंध लादण्यात आले आहेत. या सगळ्याचा परिणाम तिथल्या अर्थव्यवस्थेवर होत असून महागाईने तिथे अक्राळविक्राळ रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. वाढत्या महागाईला सरकार जबाबदार असल्याचे म्हणत पुतीन यांनी माफी मागितली आहे.
पुतीन हे वर्षाच्या अखेरीस माध्यमांना सामोरे जातात आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतात. माध्यमांशी संवाद साधत असताना विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पुतीन यांनी वाढत्या महागाईबद्दल देशाची माफी मागितली आहे. इरीना अकोपोवा नावाच्या वयोवृद्ध महिलेने रशियात वाढत्या अंड्याच्या आणि चिकनच्या दराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पुतीन यांनी जनतेची माफी मागितली. रशियामध्ये अंड्याचे दर वेगाने वाढले असून पुतीन यांनी त्यासाठीही माफी मागितली आहे. रशियामध्ये अंड्याचे दर 40 टक्क्यांनी वाढले आहेत. दोन महिन्यात अंडी 30 टक्क्यांनी महागली आहेत. रशियात एक डझन अंडी 1.8 डॉलरला (149 रुपये) मिळत आहे. अंड्याचे उत्पादन आणि अंड्यांचा दर्जा या दोन्ही घसरण झालेली असल्याने त्याचा फटका अंड्याच्या बाजाराला बसला आहे. रशियातील महागाई 8 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची भीती असून इथलं आर्थिक संकट अधिक गडद होण्याची भीती आहे.