
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची कथित मुलगी असल्याचा दावा केला जाणारी एलिझावेता क्रिव्होनोगिखने पहिल्यांदाच आपले वडील आणि युक्रेन युद्धाबाबत मौन सोडलं आहे. एलिझावेता क्रिव्होनोगिख हिला लुइझा रोझोवा नावानेही ओळखलं जातं. लुइझाने तिच्या खाजगी टेलिग्राम चॅनेलवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने “माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं”, असं म्हटलं आहे. तिने हे पुतीन यांच्यासाठी लिहिलं आहे, असं बोललं जात आहे. मात्र यात तिने त्यांचं नाव घेतलं नाही.
लुइझाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “या माणसाने लाखो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले (युक्रेनमधील) आणि माझंही आयुष्य उद्ध्वस्त केलं.” तिने पुढे म्हटले की, “जगासमोर पुन्हा येणं, हा माझ्यासाठी मुक्त जगण्याचा अनुभव आहे. असं मुक्त जगणं, मी कोण आहे आणि माझे आयुष्य कोणी उद्ध्वस्त केलं, याची आठवण करून देतं.”
कोण आहे लुइझा रोझोवा?
लुइझा चा जन्म 3मार्च 2003 रोजी सेंट पीटर्सबर्ग येथे झाला आणि पुतिन आणि त्यांची माजी क्लिनर स्वेतलाना क्रिव्होनोगिख यांच्यातील कथित प्रेमसंबंधातून तिचा जन्म झाल्याचं बोललं जातं. 2020 मध्ये क्रेमलिनमधील एक रिपोर्ट सार्वजनिक झाल्यानंतर तिच्या वडिलांची ओळख पहिल्यांदा उघड झाली. द सनमधील एका वृत्तानुसार, लुइझा ची आई तिच्या जन्मानंतर अचानक खूप श्रीमंत झाली, ज्यामुळे पुतिन यांनी तिला गप्प राहण्यासाठी पैसे दिले, असा अंदाज वर्तवला जात होता.
लुइझाचे पूर्वी अनेक सोशल मीडिया अकाउंट होते, ती खाजगी चार्टर विमानाने जगभर प्रवास करत होती. मात्र रशियाचे युक्रेनशी युद्ध सुरू होण्यापूर्वीच तिचे अकाउंट निष्क्रिय करण्यात आले. यानंतर, लुइझाने पॅरिसला राहायला गेले आणि जून 2024 मध्ये आयसीएआरटी स्कूल ऑफ कल्चरल अँड आर्ट मॅनेजमेंटमधून पदवी प्राप्त केली. रशिया सोडल्यानंतर लुइझाने तिच्या टेलिग्राम चॅनेलवर दुःख व्यक्त करत म्हटलं होतं की, आता ती सेंट पीटर्सबर्गमध्ये फिरू शकत नाही. तिच्या आवडत्या ठिकाणी जाऊ शकत नाही.