कला शाखेत संधी अनेक, 12 वी कला शाखा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षांचा निकाल लागल्यानंतर सर्वसामान्य पालकांची एक लगबग सुरू होते आणि ती म्हणजे आपल्या पाल्याच्या भविष्याच्या दृष्टीने कोणता अभ्यासक्रम योग्य आणि कोणत्या अभ्यासक्रमासाठी सहजासहजी प्रवेश मिळेल.  सर्वसाधारण विद्यार्थ्यांचा एक समज असतो विज्ञान कठीण, वाणिज्य ठीक आणि कला शाखा म्हणजे भविष्यात आपण काहीही करू शकणार नाही, परंतु कला शाखेचा विद्यार्थीसुद्धा भविष्यात चांगल्या प्रकारे व्यावसायिकरीत्या स्थिर होऊ शकतो.

बॅचलर ऑफ फाइन आर्ट (बी.एफ.ए.)

कला क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी तुम्ही बॅचलर ऑफ फाइन आर्टस् हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम निवडू शकता. फोटोग्राफी, गायन, वादन, नृत्य, संगीत इत्यादी कला प्रांतात तुम्ही तुमचं करीअर घडवू शकता.

बॅचलर ऑफ जर्नालिझम (बी.जे.)

पत्रकारिता हा एक चांगला पर्याय आहे. 12 वी नंतर हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तुम्ही करू शकता. या माध्यमातून भविष्यात  तुम्हाला प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि डिजिटल मीडिया क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या खूप चांगल्या संधी आहेत.

बॅचलर ऑफ आर्टस् ऍण्ड बॅचलर ऑफ लॉ (बी.ए.,एल.एल.बी.)

जर तुम्हाला कायद्याचा अभ्यास करण्याची आवड असेल तर बी.ए.,एल.एल.बी. या पाच वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमास 12 वीनंतर पसंती देऊ शकता. यासाठी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी तसेच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य,  यांच्यामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत प्रविष्ट होऊन उत्तीर्ण व प्रवेशासाठी पात्र होणे अनिवार्य आहे.

बॅचलर ऑफ आर्टस् (बी.ए.)

तुमची स्वतःची नैसर्गिक गुणवत्ता सिद्ध करण्याच्या दृष्टीने तुम्ही बॅचलर ऑफ आर्टस् म्हणजेच बी.ए. ही पदवी संपादन करत असताना भविष्याच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केलात तर इंग्लिश, अर्थशास्त्र  किंवा सामाजिक शास्त्र यांचा सखोल अभ्यास करून तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना प्रविष्ट होऊन प्रशासकीय सेवेत दाखल होऊ शकता. जर्मन, फ्रेंच, रशियन इत्यादी परकीय भाषा शिकून स्वतःचं वेगळं करीअर घडवू शकता.

बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऑप्लिकेशन (बी.सी.ए.)

उच्च माध्यमिक स्तरापर्यंत जरी आपण कला शाखेचे शिक्षण पूर्ण केलेले असले तरीसुद्धा आय.टी. इंडस्ट्रीमध्ये तुम्ही तुमची बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करू शकता.
बॅचलर्स डिग्री ऑफ कॉम्प्युटर ऑप्लिकेशन ही पदवी इंजिनीअरिंग इन कॉम्प्युटर सायन्स इतकीच उपयुक्त व दर्जेदार आहे. भविष्यात सॉफ्टवेअर तसेच ऑप्लिकेशन डेव्हलपर, डेटा सायंटिस्ट, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट इत्यादी क्षेत्रांत तुम्ही काम करू शकता.

बॅचलर ऑफ एज्युकेशन (बी.ए./ बी. एस्सी./ बी. एड.)

शिक्षणातील नवनवीन प्रयोग व उपक्रम यामधील अभिरुची आपल्याकडे असेल, तर आपण शिक्षक होण्यासाठी या अभ्यासक्रमास पसंती देऊ शकता. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेस प्रविष्ट होऊन उत्तीर्ण व प्रवेशासाठी पात्र होणे अनिवार्य आहे. अभ्यासक्रम कालावधी एकूण चार वर्षांचा असतो.

बॅचलर ऑफ आर्टस् (बी.ए.)

तुमची स्वतःची नैसर्गिक गुणवत्ता सिद्ध करण्याच्या दृष्टीने तुम्ही  बॅचलर ऑफ आर्टस् म्हणजेच बी.ए. ही पदवी संपादन करत असताना भविष्याच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केलात तर इंग्लिश, अर्थशास्त्र  किंवा सामाजिक शास्त्र यांचा सखोल अभ्यास करून तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना प्रविष्ट होऊन प्रशासकीय सेवेत दाखल होऊ शकता. भाषेवर प्रभुत्व असल्यास तुम्ही इंग्रजी भाषेव्यतिरिक्त जर्मन, फ्रेंच, रशियन इत्यादी परकीय भाषा शिकून स्वतःचं वेगळं करीअर घडवू शकता.

>> सुदाम कुंभार, (निवृत्त प्राचार्य तथा समुपदेशक)