
राज्यातील 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या (मंगळवारी) मतदान होत आहे. या निवडणुकीत 264 नगराध्यक्षपदाच्या जागांसाठी चार हजाराहून अधिक, तर नगरसेवकपदासाठी 50 हजारांच्या आसपास उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंदिस्त होईल.
तब्बल आठ ते दहा वर्षांनंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत असल्याने उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांची मतदानाबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी सोमवारी रात्री 10 वाजता थंडावली.
एक कोटी मतदार
उद्या सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल. राज्य निवडणूक आयोगाने 24 नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी 20 डिसेंबर ही मतदानाची तारीख जाहीर केल्याने उद्याच्या निवडणुकीसाठी जवळपास 1 कोटीच्या आसपासचे मतदार मतदानासाठी पात्र आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी सुमारे 12,316 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानासाठी ईव्हीएम मशीनचा व्यवस्था करण्यात आली असून त्यात 17,367 कंट्रोल युनिट आणि 34,734 बॅलेट युनिटची उपलब्धता करून देण्यात आली आहे.
महायुतीचा एकमेकांच्या विरोधात प्रचार
भाजपसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिंदे गटाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांनी जोरदार प्रचारसभा घेतल्या. विरोधी पक्षात काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदींनी प्रचाराचे मैदान गाजवले. या निवडणुकीत महायुतीचे नेते परस्परांच्या विरोधात प्रचार करत होते.
दुबार नावांसमोर दुहेरी चिन्ह दुबार मतदारांसाठी खबरदारी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे चिन्ह नमूद करण्यात येणार आहे.
थेट नगराध्यक्षपदाच्या 264 जागांसाठी होणार मतदान
नगरसेवकपदाच्या 6 हजार 42 जागांसाठी निवडणूक
उद्या मतमोजणी
मतमोजणी बुधवारी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. साधारणतः दुपारी चार वाजेपर्यंत नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होईल.






























































