
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन गांभीर्याने कार्य करतांना दिसत आहे. वृंदावन येथून परळीला आलेल्या 90 भाविकांची प्रशासनाने ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर असलेल्या भक्तनिवासमध्ये हलवले असून त्यांची तिथे तात्पुरती सोय केली आहे. हे सगळे भाविक भागवत कथा ऐकण्यासाठी वृंदावन येथे गेले होते. दरम्यानच्या काळात लॉक डाऊन झाल्याने हे भाविक अडकले होते. महाराष्ट्र शासनाच्या मदतीने हे भाविक परळीत दाखल झाले आहेत.
दरम्यान सोमवारी सकाळी 3.30 च्या सुमारास हे 90 भाविक दोन ट्रॅव्हल्समधून परळी येथे दाखल झाले. सुरक्षेची बाब म्हणून या सर्वांना प्रशासनाकडून ग्रामीण पोलीस ठाण्याजवळील भक्त निवास येथे ठेवण्यात आले आहे. याठिकाणी या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी 2-3 तास लागणार असल्याची माहिती परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर लटपटे यांनी दिली. यासाठी डॉक्टरांचे पथक भक्तनिवासमध्ये सकाळ पासून गेले असल्याचे त्यांनी सांगितले. या सगळ्या परिस्थितीवर परळी तहसीलदार डॉ. विपीन पाटील हे लक्ष ठेवून आहेत. दरम्यान परळीत आल्यावर याठिकाणी या भाविकांना नाश्त्याची सोयही प्रशासनाकडून करण्यात आली होती. आपल्या गावात आल्याने सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकल्याचे दिसून आले.

























































