वेब न्यूज – माणसासारखे दिसणारे अँड्रॉइडस्

801

>> स्पायडरमॅन

Promobot या रशियाच्या स्टार्टअप कंपनीने आपल्या नव्या रोबोट अँड्रॉइडची मालिका सादर करण्याचे ठरवले आहे. यापूर्वी कंपनीने हुबेहूब शास्त्रज्ञ अल्बर्ट एडिसन आणि अभिनेता अरनॉल्ड श्वार्न्झेगर यांच्याप्रमाणे दिसणारे रोबोट अँड्रॉइडस् तयार केलेले आहेत. विशेष म्हणजे आपल्यासारख्या दिसणाऱया या रोबोटची भेट खुद्द अरनॉल्डने न्यूयॉर्कमधल्या एका कार्यक्रमाच्या वेळी घेतली होती. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जगात, आपल्या आजूबाजूला व्हॉइस कमांडवरती चालणारी आणि आपल्यासाठी बातम्या वाचून दाखवणारी, हवामानाचा अंदाज कळवणारी, आपल्याला हवे असलेले गाणे वाजवणारी अनेक व्हॉइस असिस्टंट डिव्हाइसेस सहजपणे उपलब्ध आहेत. मात्र आता या संकल्पनेतच बदल करण्याचे Promobot कंपनीने ठरवले आहे. सेलेब्रिटी रोबोट अँड्रॉइडस्नंतर आता चक्क ग्राहक हुबेहूब त्याच्यासारखा दिसणारा किंवा त्याची बायको, मुलगा यांच्याप्रमाणे दिसणारा रोबोट अँड्रॉइडस् ऑर्डर करू शकणार आहेत. कंपनीने सध्या तरी या रोबोट अँड्रॉइडस्ची किंमत उपलब्ध करून दिलेली नसली तरी इच्छुक ग्राहकांनी आपला संपर्क क्रमांक दिल्यानंतर कंपनीच्या तंत्रज्ञांतर्फे त्याच्याशी संपर्क साधून पुढील व्यवहाराची बोलणी करण्यात येतील. हा रोबोट अँड्रॉइड हास्य, आश्चर्य, दुःख, कुतूहल अशा विविध 600 प्रकारच्या भावना आणि हावभाव चेहऱयाद्वारे व्यक्त करण्यास समर्थ आहे. आपल्याशी गप्पा मारता मारता तो विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेदेखील देण्यास सक्षम आहे. या रोबोट अँड्रॉइडस्साठी कंपनीतर्फे एक विशेष प्रकारची कृत्रिम त्वचादेखील विकसित करण्यात आली आहे. ‘The Sims’ या व्हिडीओ गेममधील कॅरेक्टर्सवरदेखील अशा काही रोबोट अँड्रॉइडस्ची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे हे रोबोट अँड्रॉइडस् भयकारी न दिसता मैत्रीपूर्ण आणि विश्वासू सहकारी म्हणून अधिक जवळचे वाटतात. एकूणच काय तर आपल्या आवडत्या व्यक्तीच्या किंवा अगदी स्वतःच्या सहवासात राहण्याचा आनंददेखील मिळवण्याचा एक अनोखा पर्याय या रशियन स्टार्टअप कंपनीमुळे मानवाला उपलब्ध होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या