
नौदलाच्या लढाऊ ताफ्यात लवकरच ‘वागशीर’ ही अत्याधुनिक पाणबुडी दाखल होणार आहे. प्रोजेक्ट 75 अंतर्गत तयार केलेली कलावरी वर्गातील ही शेवटची पाणबुडी आहे. या डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडीची लांबी सुमारे 221 फूट असून उंची साधारण 40 फूट आहे. तसेच यात 360 बॅटरी सेल्स आहेत.
मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये या पाणबुडीचा 40 टक्क्यांहून अधिक भाग ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत बनवण्यात आला आहे. ही पाणबुडी शत्रुराष्ट्रांची झोप उडवणार असून देशाची सागरी सीमा अभेद्य व अखंड ठेवण्यास मोठी मदत करणार आहे. पाण्याच्या पृष्ठभागावर ही पाणबुडी ताशी 20 कि.मी. वेगाने फिरते, तर पाण्याखालील वेग ताशी 37 कि.मी. आहे. समुद्राच्या तळात 350 फूट खोलीवर जाऊन शत्रूचा शोध घेण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आहे. शत्रूंचा नायनाट करण्यासाठी या पाणबुडीत अत्याधुनिक शस्त्रेही बसवली आहेत.

























































