दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱया वाई गणपती मंदिर पुलावर वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. अद्यापि या वाहतुकीच्या नियंत्रणावर व वाहतुकीच्या कोंडीवर वाई वाहतूक विभागाच्या पोलिसांचे अजिबात लक्ष नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक शाखेच्या भोंगळ कारभारावर वाईकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
दक्षिण काशी, मानाचा महागणपती म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणाऱया वाईच्या गणपतीला पर्यटकांची मोठी गर्दी असते. या भागातील मोठा ब्रिटिशकालीन पूल जमीनदोस्त केल्यानंतर नव्या पुलाची बांधणी युद्धपातळीवर सुरू आहे.
नवीन पूल वाहतुकीसाठी कधी सुरू होतोय, याच्या प्रतीक्षेत वाईकर असतानाच पर्यायी वाहतुकीसाठी उपलब्ध असणाऱया या पुलावर बेशिस्त पार्किंग, अतिक्रमणांमुळे या पुलावरील वाहतूक कायमस्वरूपी विस्कळीत होत असते. पर्यटकांनादेखील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी वाईत आल्यानंतर या वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागते. मात्र, पोलीस यंत्रणेला याचे कसलेही सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाईकर व आजूबाजूच्या ग्रामीण भागातून येणाऱया ग्रामस्थांना वाहतूककोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे स्थानिक नगरपालिका व वाहतूक पोलिसांनी या वाहतुकीला शिस्त लावणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
































































