वाई हत्याकांड प्रकरण – माफीची साक्षीदार ज्योती मांढरेला कोर्टात चक्कर

महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱया वाई तालुक्यातील थरारक हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे ही आज सातारा येथे जिल्हा न्यायालयात सुनावणीदरम्यान पिंजऱयात चक्कर येऊन कोसळली. त्यामुळे न्यायालयाचे कामकाज काही काळ तहकूब करावे लागले. आता उद्याही या खटल्याच्या सुनावणीचे कामकाज चालणार आहे.

आपण डॉक्टर असल्याचे भासवत वाई तालुक्यातील संतोष पोळ याने सहा खून केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिची आज उलटतपासणी सुरू होती. यावेळी तिने काही बाबींचा स्पष्ट खुलासा केला. कशा रीतीने संतोष पोळ याने हे खून केले ते तिने उलटतपासणीत सांगितले.

हे सांगत असताना तिच्यावर मानसिक दडपण आल्यामुळे ती पिंजऱयात चक्कर येऊन पडली. त्यामुळे न्यायालयाचे आजचे कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर सुनावणीचे कामकाज पुढे सुरू झाले. उद्यादेखील तिची उलटतपासणी पुढे सुरू राहील, अशी माहिती या खटल्यातील विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी दिली. आज संतोष पोळने न्यायालयात नवीन कुठलाही अर्ज केलेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या