
बिहार निवडणुकीत एक्झिट पोलचा काल हा एनडीएकडे वळताना दिसत आहे. पण हरयाणा निवडणुकीत वेगळेच चित्र होते असे विधान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केले. तसेच निकाल लागायला वेळ आहे पाहू अशी सावध प्रतिक्रिया खरगे यांनी दिली आहे.
खरगे म्हणाले की, सर्व एक्झिट पोल्स एनडीएला आघाडी दाखवत आहेत. ते दर्शवतात की महागठबंधनाला विशेष पाठिंबा मिळत नाही. याचप्रमाणे, हरियाणात एक्झिट पोल्सनी काँग्रेसला विजय मिळेल असे दाखवले होते, पण निकाल उलट आला आणि भाजप सत्तेवर आला. आता प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंत थांबून पाहूया, काय घडतं ते.
काँग्रेस नेते वेणुगोपाल म्हणाले की, हरयाणातील एक्झिट पोल्सनी काँग्रेसच्या प्रचंड विजयाची भविष्यवाणी केली होती, पण काय घडलं? आता आम्ही दाखवून दिलं आहे की हरयाणात प्रत्यक्षात काय झालं. त्यामुळे आता खऱ्या निकालाची वाट पाहूया.
दिल्ली स्फोटाप्रकरणी वेणुगोपाल म्हणाले की, मुंबई स्फोट झाले तेव्हा यूपीए सरकार सत्तेत होते. तेव्हा गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला होता. आता ही घटना राष्ट्रीय राजधानीत घडली आहे, ही गंभीर सुरक्षा चूक आहे. आपल्या सध्याच्या केंद्रीय गृहमंत्र्यांचे म्हणणे आहे की देशात दंगली किंवा स्फोट होत नाहीत. पण ही घटना त्यांच्या कार्यालयाजवळच झाली आहे. सरकारने या घटनेबाबत सखोल चौकशी करावी आणि खरी कारणे देशासमोर मांडावीत असेही वेणुगोपाल म्हणाले.

























































