एमएमआरडीए आणि पालिकेच्या वादात सांताक्रुझ येथील धोकादायक पूल लटकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

सांताक्रुझ-वाकोला येथील तानसा जलवाहिनीजवळचा 40 वर्षे जुना पूल अत्यंत धोकादायक बनला आहे. पालिकेने मुंबईतील सर्व पुलांचे सर्वेक्षण केल्यानंतर हा पूल ताबडतोब पाडून नवीन पूल बांधण्याची गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र हा पूल एमएमआरडीएच्या अखत्यारित येत असल्यामुळे एमएमआरडीए आणि पालिका प्रशासन यांच्या वादात हा पूल लटकला आहे. विद्यार्थी आणि नागरिकांची मात्र रोज या पुलावरून रामभरोसे ये-जा सुरू आहे.

महाड पुलाच्या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने मुंबईतील सर्व पादचारी पूल, रेल्वे पूल, उड्डाणपूल अशा एकूण 296 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. त्यात एकूण 18 पूल धोकादायक आढळले आहेत. स्थायी समितीमध्ये या धोकादायक पुलांवरून सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला होता. तेव्हा शिवसेनेचे सदस्य सदानंद परब यांनी वाकोला येथील तानसा पाइपलाइनजवळचा पादचारी पूल धोकादायक झाल्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. हा पूल धोकादायक झाल्यानंतर या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी पालिका अधिकाऱ्यांसोबत पाहणी करण्यात आली.

पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू केली, मात्र निविदा काढण्याच्या वेळी तत्कालीन मुख्य अभियंत्यांनी हा पूल एमएमआरडीएच्या अखत्यारित येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला व पुलाचे काम रखडले. पूल छोटा असल्याचे त्याच्या पुनर्बांधणीसाठी फारच कमी खर्च येणार आहे. एमएमआरडीएच्या अधिकाऱयांनीही या पुलाची पाहणी केली असून त्यांनीही हा पूल धोकादायक असल्याचे म्हटले आहे. एकतर पालिका प्रशासनाने पाठपुरावा करून या पुलाचे काम लवकर सुरू करावे किंवा स्वतः पुनर्बांधणी करून एमएमआरडीएकडून निधी वसूल करावा. दुर्दैवाने या पुलाबाबत दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण?, असा सवाल शिवसेना नगरसेवक सदानंद परब यांनी केला आहे.

14 पूल धोकादायक अवस्थेत उभे आहेत
पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहर व उपनगरातील सहा पादचारी पूल, रेल्वे हद्दीतील दोन पूल, नाला व पाइपलाइनवरील 10 पूल असे एकूण 18 पूल धोकादायक ठरवले आहेत. त्यापैकी तीन पूल पाडण्यात आले असून एका पुलाचे पुनर्बांधणीचे काम सुरू आहे, तर एक पूल खासगी जमिनीवर येत असल्यामुळे तो देखील पत्रव्यवहारात लटकला आहे. दोन पुलांसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर 11 पुलांसाठी सल्लागार नियुक्त करण्यात आले असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

काय म्हटले आहे अहवालात
हा पूल अत्यंत धोकादायक स्थितीत असून तो पाडून टाकून त्याची पुनर्बांधणी करणे आवश्यक असल्याचे या अहवालात म्हटले आहे. मात्र तरीही या पुलाची वाहतूक अजूनही तशीच सुरू आहे. याप्रकरणी पालिका प्रशासनाने 5 सप्टेंबरला एमएमआरडीएला पत्र लिहून याबाबत कळवले आहे, मात्र एमएमआरडीएने काहीही हालचाल केलेली नाही.

summary- wakola bridge got delayed repair work