
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) कार्यकारिणीची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महान फलंदाज दिलीप वेंगसरकर यांचे नाव वानखेडे स्टेडियमच्या नॉर्थ स्टॅण्डमधील (पूर्वेच्या दिशेकडील) तीन ब्लॉकला देण्यात येणार आहे. देशासाठी 116 कसोटी खेळणाऱया महान खेळाडूचा सन्मान करण्यात यावा यासाठी एमसीए सदस्य नदीम मेमन यांच्याकडून हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला यावेळी मान्यता देण्यात आली. अशी माहिती सूत्रांकडून यावेळी देण्यात आली.
संग्रहालयासाठी समितीची स्थापना
वानखेडे स्टेडियमध्ये म्युझियम (संग्रहालय) बनवण्यासाठी एमसीएकडून पाऊल उचलण्यात आले आहे. यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्ष विजय पाटील, दिलीप वेंगसरकर, प्रो. रत्नाकर शेट्टी, रवी सावंत, नवीन शेट्टी, क्लेटन मुर्जेलो व देवेंद्र प्रभुदेसाई यांचा समावेश आहे. या समितीच्या सूचना, मार्गदर्शनाद्वारे हे म्युझियम उभारण्यात येणार आहे.
लालचंद राजपूत क्रिकेट सुधारणा समितीचे प्रमुख
एमसीएच्या मागील बैठकीत क्रिकेट सुधारणा समिती सदस्यांची निवड करण्यात आली होती. या समितीत लालचंद राजपूत, राजू कुलकर्णी व समीर दिघे या तिघांचा समावेश करण्यात आला होता, पण या बैठकीत त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच लालचंद राजपूत यांना या समितीचा प्रमुख बनवण्यात आले.
बैठकीतील आणखी काही मुद्दे
- सुनील गावसकरांना पहिली कसोटी खेळून पुढल्या वर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. एमसीएकडून सुनील गावसकरांची गोल्डन ज्युबिली साजरी करण्याची योजना तयार करण्यात येत आहे. यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात येणार आहे.
- मुंबईतील क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी समितीची स्थापना करणार. ही समिती नियम बनवेल. त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून परवानगी घेतली जाईल.
- महेंद्रसिंह धोनीने वानखेडे स्टेडियमवर षटकार मारून हिंदुस्थानला 2011 साली वर्ल्ड कप जिंकून दिला. त्यावेळी चेंडू ज्या सीटवर पडला होता, त्या सीटला त्याचे नाव देण्याचा प्रस्तावही पुढे आला आहे. या प्रस्तावावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.





























































