युद्ध आणखी भडकण्याची शक्यता; शेअर बाजारातील अस्थिरतेच्या शक्यतेने सोन्याचे भाव वधारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर सुमारे 5 हजार रॉकेट डागले. त्यानंतर इस्रायलनेही प्रत्युत्तरादाखल कारवाई सुरू करत गाझापट्टीवर हल्ल्याला सुरुवात केली आहे. तसेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासचा खात्मा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच हमासच्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करणार असून जनतेने मोठ्या युद्धासाठी तयार राहावे, असे आवाहन इस्रायली जनतेला केले आहे. त्यामुळे हे युद्ध दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे.

हे युद्ध दीर्घकाळ सुरू राहिल्यास त्याचा परिणामजागतिक अर्थव्यवस्था आणि जागतिक शेअरबाजारावरही होतो. अशा अनिश्चित काळात तोटा टाळण्यासाठी आणि जमापूंजी सुरक्षित राहण्यासाठी अनेकजण सोन्यात गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडतात. त्यामुळे सोन्याचे दर वाढतात. आता इस्रायल आणि हमासमधील युद्धामुळे जगात आर्थिक अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वच देशातील शेअर बाजार कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे वळले आहेत. त्यामुळे सोन्याचे दर वधारले आहेत.

इस्रायल व हमास यांच्यातील युद्धामुळे पहिल्या दिवसापासून सोन्याच्या भावात वाढ होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी रविवारीही सोन्याच्या दरात 600 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने 58 हजार 500 रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. त्यामुळे रविवार असतानादेखील सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. चांदीचे दर मात्र 69 हजार 500 रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.

शोअर बाजारात 10 दिवसांपूर्वी तेजी असल्याने सोने-चांदीच्या भावात घसरण व्हायला सुरुवात झाली होती. मात्र, आता जागतिक वातावरण बदलत असल्याने त्यात पुन्हा वाढ होत आहे. आता हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध भडकले आहे. हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. तसे झाले तर शेअर बाजारावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारी 7 ऑक्टोबर रोजी चांदीच्या भावात एक हजार 600 रुपयांची वाढ झाली. तर सोन्याचे भाव 300 रुपयांनी वाढले होते. त्यानंतर रविवारी 8 ऑक्टोबर रोजी पुन्हा सोन्याच्या भावात 600 रुपयांची वाढ झाली. रविवारी सोन्या-चांदीचे भाव स्थिर असतात. मात्र, जगावर युद्धाचे सावट असल्याने या रविवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.