
हिंगणेतील विद्यानंद हॉलपुढे अजिंक्यनगर सोसायटीच्या मागील बाजूस मोकळ्या मैदानात असलेल्या भंगार साहित्याच्या गोदामाला शुक्रवारी पहाटे आग लागून साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन 20 मिनिटांमध्ये आग आटोक्यात आणून दीड तासात संपूर्ण आग विझवली.
अजिंक्यनगर सोसायटीच्या मागे एक भंगार साहित्याचे गोदाम आहे. त्या ठिकाणी दीड हजार स्केअरफूट जागेत ते गोदाम असून त्या ठिकाणी सर्व भंगारचे साहित्य जमा करण्यात आले होते. शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीचा कॉल मिळाला. त्यानुसार सिंहगडरोड अग्निशमन केंद्रातील दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणून विझवली.
आगीत भंगाराचे साहित्य जळून खाक झाले. त्याठिकाणी 10 कामगार राहत होते. त्यांना वेळीच आगीबाबत समजल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. ही कामगिरी सिंहगडरोड अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख सुरेश उमराटकर, तांडेल शिवाजी मुजुमले, जवान प्रमोद मरळ, शिवाजी आटोळे, विलाास घडशी, संतोष नलावडे तर चालक देशमुख यांनी बजावली.




























































